गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात संगीतकार पलाश मुच्छल (Mandhana) आणि भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधाना लग्नबंधनात अडकणार होते. त्यांच्या लग्नाच्या बातमीमुळे त्यांचा मित्रपरिवार आणि चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला होता. मात्र, अचानक हे लग्न रद्द करण्यात आले. स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने लग्न थांबवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, पण काही दिवसांनी स्वतः स्मृतीने हे लग्न होणार नसल्याचे जाहीर केले.
यानंतर सोशल मीडियावर पलाशने स्मृतीला लग्नाच्या आदल्या रात्री चीट केल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या आणि पलाशला यामुळे खूप ट्रोलही करण्यात आले. या घटनेला कायदेशीर वळणही मिळाले. एकेकाळी स्मृतीचा जवळचा मित्र असलेल्या विज्ञान मानेने पलाशवर अनेक गंभीर आरोप केले होते. याशिवाय, विज्ञानने पलाशवर ४० लाख रुपयांच्या फसवणुकीचाही आरोप केला आहे. एका चित्रपटासाठी दिलेले पैसे पलाशने परत केले नाहीत, असं विज्ञानचं म्हणणं आहे. विज्ञान हा स्मृतीचा बालपणीचा मित्र असून स्मृतीच्या वडिलांनीच त्याची ओळख पलाशशी करून दिली होती.
40 लाखांची फसवणूक, स्मृती मानधना कनेक्शन अन् पलश मुच्छलने पाठवली 10 कोटींची मानहानीची नोटीस
आपल्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावत पलाश मुच्छालने थेट १० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला. पलाशचे वकील श्रेयांश आर. मिठारे यांनी हायकोर्टात बाजू मांडताना सांगितलं की, हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे असून केवळ पलाशची बदनामी करण्याच्या उद्देशाने केले गेले आहेत. दरम्यान, पलाश मुच्छाल आणि स्मृती मानधना यांच्या खासगी आयुष्याबद्दल वाट्टेल ते दावे करणाऱ्या विज्ञान मानेला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून पलाशच्या चारित्र्यावर आणि स्मृतीसोबतच्या तुटलेल्या लग्नावर चिखलफेक करणाऱ्या विज्ञान मानेला कोर्टाने कडक शब्दांत ताकीद दिली असून, पलाशच्या बाजूने अंतरिम दिलासा दिला आहे.
या निकालामुळे आता विज्ञान मानेला पलाश किंवा स्मृतीबद्दल कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य किंवा सोशल मीडिया पोस्ट करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पलाशचे मुद्दे ग्राह्य धरले आणि पुढील सुनावणीपर्यंत, म्हणजेच ११ मार्च २०२६ पर्यंत विज्ञान मानेला पलाश किंवा स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणत्याही प्रकारचं भाष्य करण्यापासून मज्जाव केला आहे. एकेकाळी स्मृतीचा जवळचा मित्र असलेल्या विज्ञानने पलाशवर जे आरोप केले, त्यामुळे स्मृतीच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. पलाशने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली होती की, तो आपल्या स्वाभिमानासाठी शेवटपर्यंत लढेल.
