मराठी दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे ( Nagaraj Manjule ) हे आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनय शैलीसाठी ओळखले जातात. सामाजिक आशय असणारे व त्यातून समाजाचे प्रबोधन होणार सिनेमा नागराज मंजुळे बनवत असतात. आता त्यांनी कुस्तीपटू खाशाबा जाधव ( Khashaba Jadhav ) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. खाशाबा जाधव यांनी कुस्ती खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदा मेडल मिळवून दिले होते. त्यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार असल्याचे नागराज मंजुळेंनी सांगितले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात उमळवाड येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नागराज मंजुळे आले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या घोषणेने कुस्तीपटूंना मोठ्या प्रमाणावर आनंद झाला आहे.
नागराज मंजुळे यांनी फँड्री सारखा सामाजिक आशय असणारा चित्रपट बनवला आहे. तसेच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सैराट या चित्रपटाने बॉक्स ऑफसवर धुमाकूळ घातला होता. सैराट हा पहिला असा मराठी सिनेमा आहे की ज्याने 100 कोटींच्या वर कमाई केली आहे. तसेच त्यांनी झुंड या सिनेमाचे देखील दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात एक फुटबॉल कोचची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यामध्ये खुद्द महानायक अमिताभ बच्चन यांनी कोचची भूमिका केली होती. तसेच नागराज यांनी नाळ या मराठी सिनेमात अभिनय देखील केला आहे.
दरम्यान नागराज यांचा घर, बंदुक, बिरयाणी नावाचा सिनेमा पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर व गाणे प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.