Ohh My Dog review: आजच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत अॅक्शन, हिंसा आणि भव्यतेची स्पर्धा सुरू असताना दिग्दर्शक अमित राय (Amit Rai) पुन्हा एकदा वेगळा मार्ग निवडतात. OMG 2 सारख्या संवेदनशील विषयानंतर ते यावेळी ओ माय डॉगच्या (Ohh My Dog) माध्यमातून एका लहान मुलाचा आणि एका भटक्या कुत्र्याचा हळवा, भावनिक आणि विचार करायला लावणारा प्रवास पडद्यावर आणतात. ही केवळ एका कुत्र्याची कथा नाही, तर माणुसकी, करुणा, निसर्ग आणि निःस्वार्थ प्रेमाची गोष्ट आहे. चित्रपटाचा गाभा मुलगा आणि एका भटक्या कुत्र्याच्या भावनिक नात्यावर आधारित असून, अमित राय यांनी भारतीय सिनेमात मुलांसाठी दर्जेदार चित्रपटांची कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.
कथा : एका कुत्र्याच्या शोधात सापडते माणुसकी
चित्रपटाची कथा दोन समांतर प्रवाहांमधून उलगडत जाते. सुरुवातीला मुंबईत ‘सेनापती’ नावाच्या श्वान पोलिसाच्या अंत्यसंस्काराचा आणि त्याने देशसेवेसाठी दिलेल्या अज्ञात त्यागाचा हळवा प्रसंग प्रेक्षकांना भावनिक स्पर्श करून जातो. त्यानंतर कथानक बिहार आणि आसाम या दोन वेगवेगळ्या प्रदेशांत विभागले जाते.
आसाममध्ये सकाळच्या खेळादरम्यान लहानगा ‘अप्पू’ (माही राय) याचा लाडका श्वान ‘मोमो’ (ऑस्कर) अचानक बेपत्ता होतो. स्थानिक पोलीस अधिकारी (SHO) युसूफ (विजय विद्याधर मिश्रा) अप्पूला मोमोचा शोध घेण्याचे आश्वासन देतात. मात्र, अप्पूच्या चिंताग्रस्त आईला (गीता अग्रवाल शर्मा) ते वास्तवाची जाणीव करून देतात. परिसरात एका जमातीकडून अन्नासाठी कुत्र्यांची तस्करी होत असल्याने मोमो पुन्हा मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर असल्याचे ते सांगतात. दरम्यान, अप्पूची शिक्षिका कृष्णा (सुलक्षणा बरुआ) आणि इतरही या शोध मोहिमेत सहभागी होतात. आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्टफोन, आयपॅड आणि डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करत ते मोमोचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. हा भाग पाहताना अलीकडेच प्रदर्शित झालेल्या प्रीतम अँड पेड्रो मधील प्रीतम या पात्राची सहज आठवण होते. त्या चित्रपटातही गॅझेट्सचा प्रभावी वापर कथानकाचा महत्त्वाचा भाग होता; इथेही त्याच धर्तीवर तंत्रज्ञान कथेला नवे परिमाण देते.
दुसरीकडे बिहारमध्ये ‘प्रिन्स’ (निखिल कुमार) हा गरीब तरुण अचानक बेपत्ता होतो. त्याचा अत्यंत निष्ठावान श्वान ‘ऑस्कर’ (ब्रुनो) आपल्या मालकावर काहीतरी संकट ओढवले असल्याची चाहूल घेत त्याच्या वासाचा मागोवा घेत शोधमोहीम सुरू करतो. प्रिन्सचे मित्र त्याच्या दुःखात बुडालेल्या आई-वडिलांना आणि बहिणींना आधार देत मदतीसाठी ‘मास्तरजी’ (पंकज त्रिपाठी) यांच्याकडे धाव घेतात. त्यानंतर ते स्थानिक दारोगा (राजेश कुमार) यांची मदत मागतात. मात्र, या सर्वांना माहीत नसते की शहरात किडनी तस्करीचे एक मोठे रॅकेट कार्यरत असून, हा दारोगा आणि त्याचे काही सहकारी त्या गुन्हेगारी टोळीशी संगनमत करून आहेत. या अवैध धंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याच्या मोबदल्यात त्यांनाही त्यांचा हिस्सा मिळत असतो. याच धक्कादायक वास्तवातून पुढे कथानक अधिक थरारक आणि उत्कंठावर्धक वळण घेत जाते.
या सिनेमाची गोष्ट ही बहुपदरी आहे … हरवलेल्या कुत्र्याचा शोध इथपर्यंतच मर्यादित न राहता… दुसऱ्या कथेचा गोफ विणताना पहिल्या कथेचा व्यत्यास आपल्याला दिसतो… एकीकडे भटका कुत्रा त्याला लळा लावणारा मुलगा अचानक गायब झाला आहे. त्याचा मागवा घेतोय आणि दुसरीकडे घरातला पाळीव कुत्रा हरवला त्याचा शोध लहान मुलगा घेतोय… एकमेकांना समांतर जाणाऱ्या या दोन गोष्टींचा वेध अमित रायने ‘ओ माय डॉग’ या सिनेमामध्ये घेतला आहे.
ही शोधमोहीम पुढे जाताना केवळ एका हरवलेल्या कुत्र्यापुरती मर्यादित राहत नाही. ती प्राण्यांवरील अन्याय, समाजाची संवेदनशीलता, माणसाचे स्वार्थी वर्तन आणि प्रेमाची खरी व्याख्या यांवर भाष्य करू लागते. कथा एका क्षणी डोळ्यात पाणी आणते तर दुसऱ्याच क्षणी चेहऱ्यावर हसूही फुलवते.
कुत्रा व माणसातल्या नात्याचा वेध घेणारी फिल्म म्हटल्यावर तेरी मेहरबानिया या सिनेमाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. हम आपके है कौनमधला टफी, बोल राधा बोलमधला आणि माँमधील कुत्र्याचे आपल्या मनात वेगळे स्थान आहेच… पण अक्षयकुमारच्या एंटरटेनमेंटमधील गोल्डन रिटेरीव्हीर आणि चिल्लर पार्टीमधील भिडू देखील आपल्या मनात अनोखी जागा करून गेला आहे.
पंकज त्रिपाठी – पडद्यावरची संयमी ताकद
पंकज त्रिपाठी यांची भूमिका मोठी नसली तरी प्रभाव अफाट आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील साधेपणा, संवादातील संयम आणि भावनांवरची पकड पुन्हा एकदा सिद्ध करते की अभिनयासाठी मोठमोठे संवाद आवश्यक नसतात. अमित राय आणि पंकज त्रिपाठी यांची OMG 2 नंतरची ही जोडी पुन्हा एकदा जादू निर्माण करते. विशेष म्हणजे, कथेवर असलेल्या विश्वासामुळे पंकज त्रिपाठी यांनी या चित्रपटासाठी मानधन न घेता काम केल्याची माहिती दिग्दर्शकाने दिली होती. पवन मल्होत्राने साकारलेला आरटीओ अधिकारी आणि संतप्त मामा नेमकेपणाने साकारला आहे. विजय मिश्राने साकारलेला एसएचओ तितकाच प्रभावी आहे. मोठया गुणवत्तेचा अभिनेता आहे. याची चुणूक आपल्याला दिसते… त्याने साकारलेला तुघलक आठवल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. विजयने त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले आहे.
बालकलाकार आणि ‘खरे’ हिरो
चित्रपटातील बालकलाकार अत्यंत नैसर्गिक अभिनय करतो. त्याच्या डोळ्यांतील वेदना, कुत्र्यावरचं प्रेम आणि त्याला शोधण्याची धडपड प्रेक्षकांना भावनिकरित्या जोडून ठेवते. मात्र या चित्रपटाचे खरे स्टार आहेत ऑस्कर आणि ब्रुनो हे श्वान कलाकार. त्यांच्या हावभावांतून उमटणाऱ्या भावना अनेक प्रसंगी शब्दांपेक्षा प्रभावी ठरतात.
दिग्दर्शन : साध्या कथेला दिलेली मोठी उंची
अमित राय यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे ते संदेश देताना कधीही उपदेशात्मक होत नाहीत. ते भावनांना प्राधान्य देतात आणि प्रेक्षकांना स्वतः विचार करायला भाग पाडतात. चित्रपटात काही प्रसंग अत्यंत सिनेमॅटिक आहेत, पण ते कथेला पूरक वाटतात. कुठेही अनावश्यक मेलोड्रामा जाणवत नाही.
तांत्रिक बाजू
छायांकन सुंदर आहे. शहरातील रस्ते, कुत्र्यांचे समूह आणि मुलाच्या नजरेतून दिसणारे जग कॅमेऱ्याने प्रभावी टिपले आहे. पार्श्वसंगीत भावनांना योग्य साथ देते. गाणी कथानकात सहज मिसळतात आणि चित्रपटाचा वेग बिघडवत नाहीत.
चित्रपटाची बलस्थानं
माणूस आणि प्राण्याच्या नात्यावर आधारित हृदयस्पर्शी कथा.
पंकज त्रिपाठी यांचा संयत आणि परिणामकारक अभिनय.
बालकलाकार आणि श्वान कलाकारांचा नैसर्गिक अभिनय.
संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्याजोगा स्वच्छ, सकारात्मक चित्रपट.
कमकुवत बाजू
दुसऱ्या भागातील काही प्रसंग किंचित संथ वाटू शकतात. व्यावसायिक मसाला चित्रपटांची अपेक्षा ठेवून येणाऱ्या प्रेक्षकांना हा चित्रपट शांत आणि संथ वाटू शकतो. ओ माय डॉग हा फक्त ‘डॉग फिल्म’ नाही. तो माणूस आणि मुक्या जीवामधील विश्वास, नातं आणि प्रेमाचा उत्सव आहे. आजच्या गोंगाटात हरवलेली संवेदनशीलता हा चित्रपट अलगद परत आणतो. मनोरंजनासोबत हृदयाला स्पर्श करणारा, मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने अनुभवावा असा हा चित्रपट आहे. थिएटरमधून बाहेर पडताना तुमच्या डोळ्यांत पाणी आणि चेहऱ्यावर हसू असेल, एवढी खात्री हा चित्रपट देतो. ‘ओ माय डॉग’ हा केवळ पाहण्याचा नाही, तर मनापासून अनुभवण्याचा सिनेमा आहे.रेटिंग : ⭐⭐⭐⭐☆ (4/5)
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक
का पाहावा ? माणूस आणि कुत्रा यांच्यातील अतूट नात्याचा एक हृदयस्पर्शी सोहळा.
का टाळावा ? मसाला ऍक्शनपटाची अपेक्षा असेल तर…
थोडक्यात काय ? मनोरंजनासोबत करुणा, संवेदनशीलता आणि माणुसकीचा संदेश देणारी रंजक फिल्म
⭐⭐⭐⭐
कलाकार: पंकज त्रिपाठी, गीता अग्रवाल शर्मा, माही राय, पवन मल्होत्रा, सुलक्षणा बरुआ, ऑस्कर (कुत्रा), ब्रुनो (कुत्रा), जितेन्द्र जोशी
दिग्दर्शक: अमित राय
