अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक (Election) आज, रविवार दि. ७ जून ला मुंबईत सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. मुंबई सोबत पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या विभागांत हे मतदान झाले असून महामंडळाच्या ३४०३ मतदारांपैकी १६९८ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी ४९.९० टक्के मतदानाची नोंद झाली.
सभासदांनी दिलेला हा प्रतिसाद उल्लेखनीय ठरला असून चित्रपट महामंडळाविषयी असलेला विश्वास आणि बांधिलकी अधोरेखित करणारा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत समर्थ पॅनल आणि चित्रकर्मी पॅनल यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ‘देऊळ बंद २’ च्या संपूर्ण टीमचे कौतुक
मुंबईत मतदानासाठी उपस्थित असलेल्या कलाकारांमध्ये किशोरी शहाणे, जयवंत वाडकर, सोनाली खरे, केदार शिंदे, निलम शिर्के-सामंत, प्रसाद ओक, स्वप्निल जोशी, विजय गोखले, संजय जाधव, प्रिया बेर्डे, पुष्कर श्रोत्री, अभिजीत पानसे, संदीप पाठक, उषा नाईक, शरद पोंक्षे, प्रदीप वेलणकर, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, विद्याधर पाठारे, प्रशांत दळवी, मेघा घाडगे, सादिक चितळीकर, विशाखा सुभेदार, राजू पार्सेकर, ऋषी देशपांडे, रणजीत जोग, अनंत जोग, संजय छाब्रिया, मंगेश देसाई, प्रणव रावराणे, मैथिली जावकर, प्रदीप कबरे आणि सुषमा शिरोमणी आदीं मान्यवरांचा समावेश होता.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या भविष्यातील वाटचालीसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असून सभासदांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महामंडळाच्या कार्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. संपूर्ण मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याबद्दल उपस्थित सभासदांनी समाधान व्यक्त केले.
निवडणुकीची मतमोजणी उद्या, दि. ८ जून रोजी कोल्हापूर येथे होणार असून त्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल. त्यामुळे संपूर्ण मराठी चित्रपट क्षेत्राचे लक्ष आता या निकालाकडे लागले आहेत.
