अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमार्फत नाट्य लेखन प्रोत्साहन योजना

नव्या नाट्य लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ दरवर्षी प्रमाणे राबविण्यात येत असते.

Untitled Design (100)

Untitled Design (100)

Playwriting Promotion Scheme : मराठी नाट्य परिषद व मराठी रंगभूमी नव्या नाटकांच्या शोधात कायम असते. मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्य लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी नाट्य परिषदेतर्फे ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ दरवर्षी प्रमाणे राबविण्यात येत असते. मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा अनेक प्रतिभावान नाटककारांच्या सर्जनशील लेखणीतून घडली आहे. काळ बदलत आहे, समाज बदलत आहे आणि त्यासोबत माणसांचे प्रश्न, नाती, संघर्ष आणि जगण्याचे संदर्भही बदलत आहेत. या बदलत्या वास्तवाचे प्रतिबिंब नव्या नाटकांमधून रंगभूमीवर उमटणे ही आजची गरज आहे.

अनेक नवोदित आणि प्रतिभावान लेखकांच्या मनात नाटकाची संकल्पना आहे, कथा आहे, व्यक्तिरेखा आहेत; मात्र त्या संकल्पनेला रंगमंचापर्यंत नेण्यासाठी योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहनाची आवश्यकता असते. हीच गरज ओळखून नाट्य परिषद नाट्यलेखकांसाठी ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ सातत्याने राबवित असल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले यांनी सांगितले.

मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द; नगरसेवकपदावर संकट, ठाकरे गटाला धक्का?

या योजनेच्या माध्यमातून नव्या नाट्यलेखनाला प्रोत्साहन मिळावे, नवीन नाटककारांना संधी मिळावी आणि मराठी रंगभूमीला आशयघन, दर्जेदार व काळाशी संवाद साधणारे नवे साहित्य मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. मराठी रंगभूमीला नव्या लेखकांची, नव्या विषयांची आणि नव्या विचारांची गरज आहे. आपण लिहिलेले एक नाटक उद्याच्या रंगभूमीचा महत्त्वाचा अध्याय ठरू शकते. त्यामुळे सर्व अनुभवी, नवोदित आणि रंगभूमीवर काहीतरी नवे सांगण्याची इच्छा असलेल्या नाट्य लेखकांनी ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजने’त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे नाट्य परिषदेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे. तसेच पारितोषिक प्राप्त संहिता प्रकाशित करण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे.

नाट्यलेखनासाठी पाठविण्यात येणारी संहिता मराठी भाषेतील व दोन अंकी असावी. तसेच सदर संहिता पूर्णपणे नव्याने लिहिलेली असावी. संहिता यापूर्वी अन्य कोणत्याही नावाने नोंदणीकृत अथवा प्रकाशित केलेली नसावी. सदर नाट्यसंहितेचे यापूर्वी कोणतेही नाट्यप्रयोग झालेले नसावेत. लेखकांनी त्यांच्या नाट्यसंहितेच्या दोन टंकलिखित किंवा सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या प्रती दिनांक 20 ऑक्टोबर 2026 पूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, मनमाला टँक रोड, माटुंगा, मुंबई 400016 येथील मध्यवर्ती कार्यालयात पाठवाव्यात. प्रवेश अर्ज नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. प्रोत्साहन पारितोषिक : रू. 21,000/-, रू. 15,000/-, रू. 11,000/-, रू. 3,000/- तसेच संगीत नाटकासाठी विशेष पारितोषिक रू. 11,000/- अधिक माहितीसाठी 8591706887 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Exit mobile version