PRAHAR THE UNTOLD STORY OF UJJWAL NIKAM : अभिनेता म्हणून एखाद्या कलाकाराचं काम पाहून त्याचे चाहते होणं आणि काही वर्षांनंतर त्याच कलाकारासोबत एकाच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं, हा अनुभव नक्कीच खास असतो. असाच काहीसा अनुभव अभिनेता ऋत्विक साहोरेला आला आहे. काही वर्षांपूर्वी ‘स्त्री’ चित्रपटाच्या यशाच्या पार्टीत ऋत्विकने (Ritvik Sahore) अभिनेता राजकुमार राव यांच्यासोबत फोटो काढला होता. विशेष म्हणजे, आता ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटात ऋत्विक राजकुमार राव (Rajkummar Rao) यांच्या मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
या चित्रपटात राजकुमार राव हे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam) यांच्या भूमिकेत आहेत, तर ऋत्विक साहोरे हा अनिकेत निकमची भूमिका साकारत आहे. काही वर्षांपूर्वी राजकुमार राव यांच्यासोबत केवळ एक फोटो काढण्यासाठी धाडस गोळा करणारा ऋत्विक आता त्यांच्यासोबत पडद्यावर वडील-मुलाच्या भूमिकेत झळकणार आहे.
‘राजकुमार राव यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न होतं’
‘स्त्री’ चित्रपटाच्या यशाच्या पार्टीतला तो प्रसंग आठवताना ऋत्विकने आपल्या भावना व्यक्त केल्या. या पार्टीला तो अभिनेता अपारशक्ती खुराना याच्यासोबत गेला होता. अपारशक्ती हा त्याचा जवळचा मित्र असून, त्यानेच ऋत्विकला या पार्टीत नेलं होतं. ऋत्विक म्हणाला, “आयुष्याचं वर्तुळ अनपेक्षित पद्धतीने पूर्ण होतं, हे खूपच आश्चर्यकारक आहे. मला आठवतंय, मी अपारशक्तीसोबत ‘स्त्री’ चित्रपटाच्या यशाच्या पार्टीला गेलो होतो. राजकुमार राव यांचं काम मला नेहमीच खूप आवडलं आहे. मी त्यांचा मोठा चाहता आहे; पण स्वभावाने थोडा लाजाळू असल्यामुळे त्यांच्याकडे जाऊन फोटो मागण्यासाठी मला धाडस गोळा करावं लागलं होतं. त्यावेळी एक दिवस त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी, अशी माझी इच्छा होती.”
राजकुमार राव यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं !
‘प्रहार’मध्ये राजकुमार राव यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना ऋत्विक म्हणाला, “काही वर्षांनंतर मला त्यांचा मुलगा साकारण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत काम करणं हा माझ्यासाठी खूप खास अनुभव होता. ते एक अप्रतिम अभिनेता आहेतच; पण त्याचबरोबर ते खूप चांगले माणूसही आहेत. सेटवर ते सर्वांशी प्रेमाने वागतात आणि इतर कलाकारांनाही मोकळेपणाने काम करू देतात. त्यांचं काम पाहूनच मला खूप काही शिकायला मिळालं आहे. तो पुढे म्हणाला, “सेटवर ते विनोद करत असतात, सगळ्यांसोबत मजा-मस्ती करतात; पण कॅमेरा सुरू होताच ते पूर्णपणे उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत शिरतात. त्यांचं हे रूप पाहणं माझ्यासाठी प्रेरणादायी होतं.”
‘प्रहार’च्या सेटवर पुन्हा तोच फोटो!
‘स्त्री’ चित्रपटाच्या पार्टीतील फोटोबद्दल ऋत्विकने राजकुमार राव यांना सांगितलं होतं. त्यावेळी राजकुमार यांनी तोच फोटो पुन्हा काढण्याची कल्पना सुचवली. त्यानंतर ‘प्रहार’च्या सेटवर दोघांनी पुन्हा तशाच प्रकारे फोटो काढला. या आठवणीबद्दल ऋत्विक म्हणाला, “तो फोटो पुन्हा काढताना मला खरोखरच आयुष्याचं वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर ‘दादा’ या चित्रपटातही राजकुमार राव यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. माझ्यासाठी हा अनुभव आणखी आनंददायी होता. यापेक्षा अधिक काही मागू शकलो नसतो.”
बालकलाकार ते वैविध्यपूर्ण भूमिकांचा प्रवास
ऋत्विक साहोरेने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ‘फेरारी की सवारी’ आणि ‘दंगल’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर ‘फ्लेम्स’, ‘इंदोरी इश्क’, ‘कॅम्पस डायरीज’ आणि ‘जमना पार’ यांसारख्या वेब सीरिजमधूनही त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता ‘प्रहार’मध्ये अनिकेत निकमची भूमिका साकारत तो एका वेगळ्या प्रकारच्या भूमिकेत दिसणार आहे. उज्ज्वल निकम यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेतलेल्या या कथेत वडील-मुलाच्या नात्यालाही महत्त्व आहे. दरम्यान, ऋत्विकच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘दादा’ या क्रीडाविषयक चरित्रपटाचाही समावेश आहे. या चित्रपटात तो एका अत्यंत लोकप्रिय क्रिकेटपटूची भूमिका साकारणार आहे. मात्र, या पात्राची ओळख अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे. एकेकाळी राजकुमार राव यांच्यासोबत फोटो काढण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ऋत्विकचा प्रवास आता त्यांच्यासोबत पडद्यावर वडील-मुलाची भूमिका साकारण्यापर्यंत पोहोचला आहे. ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटात राजकुमार राव आणि ऋत्विक साहोरे यांची जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
