Pritam And Pedro Review : ओटीटीवर क्राइम थ्रिलरची रेलचेल असताना प्रत्येक मालिकेला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं तितकंसं सोपं राहिलेलं नाही. अशा वेळी JioHotstar वर प्रदर्शित झालेली ‘प्रीतम अँड पेड्रो’ (Pritam And Pedro) ही वेबसीरिज आपल्या वेगळ्या विषयामुळे लक्ष वेधून घेते. सायबर क्राइम, हॅकिंग, अपहरण, भावनिक नातेसंबंध आणि हलका फुलका विनोद यांचं प्रभावी मिश्रण या मालिकेत पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या मालिकेच्या कथेशी राजकुमार हिरानी यांचं नाव जोडलेलं असल्यामुळे अपेक्षा आधीच उंचावल्या होत्या. त्या अपेक्षा ही मालिका कितपत पूर्ण करते? जाणून घेऊया…
कथा नेमकी काय आहे?
गोव्यात राहणारा प्रीतम पारकर (वीर हिरानी) आपल्या आजोबांसोबत साधं आयुष्य जगत असतो. त्याच्या आजोबांसाठी त्यांच्या दिवंगत पत्नीच्या आवाजातील गाणं असलेला टेपरेकॉर्डर ही केवळ वस्तू नसून त्यांच्या आयुष्याची शेवटची आठवण असते. तो टेपरेकॉर्डर चोरीला जातो आणि आजोबा पूर्णपणे खचून जातात.
प्रीतम पोलिसांकडे मदत मागतो; मात्र त्याच्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. उलट वाद होऊन तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो. त्याचवेळी 28 लाख रुपयांचं एटीएम चोरीला गेल्यामुळे पोलिसांवर मोठा दबाव असतो. प्रीतम अवघ्या 15 मिनिटांत आरोपी शोधून दाखवण्याचं आव्हान स्वीकारतो आणि आपल्या हॅकिंग कौशल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देतो.
इथून त्याची आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी पेड्रो गोंसाल्विस (अर्शद वारसी) यांची भन्नाट जोडी तयार होते. दरम्यान एका मंत्र्याच्या मुलाचं अपहरण होतं आणि तपासात समोर येतो तंत्रज्ञानात पारंगत, बुद्धिमान आणि अत्यंत धोकादायक मार्टिन (विक्रांत मेसी-Vikrant Massey). त्यानंतर सुरू होतो बुद्धी, तंत्रज्ञान आणि वेळेशी चाललेला थरारक खेळ.
काय आहे मालिकेचं सर्वात मोठं बलस्थान?
‘प्रीतम अँड पेड्रो’चं सर्वात मोठं यश म्हणजे तिची वेगवान मांडणी. सहा भागांची ही मालिका कुठेही अनावश्यक लांबवलेली वाटत नाही. प्रत्येक एपिसोडच्या शेवटी असा ट्विस्ट दिला जातो की पुढचा भाग लगेच पाहण्याची इच्छा होते.
सायबर क्राइम हा विषय केवळ तांत्रिक न ठेवता सामान्य प्रेक्षकांनाही सहज समजेल अशा पद्धतीने सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हॅकिंग किंवा डिजिटल गुन्ह्यांविषयी फारशी माहिती नसलेल्या प्रेक्षकांनाही कथा गुंतवून ठेवते.
राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांमध्ये दिसणारा विनोद, भावना आणि नात्यांचा स्पर्श या मालिकेतही अधूनमधून जाणवतो. त्यामुळे ही मालिका केवळ क्राइम थ्रिलर राहत नाही, तर ती मानवी नात्यांची गोष्टही बनते.
अर्शद वारसी भाव खाऊन जातो…
अर्शद वारसी हा या मालिकेचा आत्मा आहे. त्याचा सहज अभिनय, भन्नाट कॉमिक टायमिंग आणि गंभीर प्रसंगांमधील संयत अभिनय मालिकेला वेगळ्याच उंचीवर नेतो. अनुभवी पण तंत्रज्ञानात मागे असलेला पोलीस अधिकारी त्याने अत्यंत विश्वासार्हपणे उभा केला आहे. वीर हिरानीचा हा पदार्पणातील अभिनय आश्वासक आहे. आत्मविश्वास, निरागसपणा आणि बुद्धिमत्ता यांचा त्याने चांगला मिलाफ साधला आहे.
मात्र खरी कमाल करतो विक्रांत मेसी. त्याची एंट्री उशिरा होते; पण त्यानंतर तो संपूर्ण कथानकावर वर्चस्व गाजवतो. शांत, बुद्धिमान आणि धोकादायक खलनायक म्हणून त्याने जबरदस्त छाप सोडली आहे. मोना सिंग, सत्यदीप मिश्रा, श्रुती मराठे, जयंत गाडेकर आणि झाकीर हुसेन यांनीही आपल्या भूमिका समर्थपणे साकारल्या आहेत. गौरव मोरे छोट्या भूमिकेत छाप सोडतो… नचिकेत पूर्णपात्रे हा चेहरा चांगलेच लक्ष वेधून घेतो. त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलं आहे.
दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू
दिग्दर्शक अविनाश अरुण याने मालिकेचा वेग कुठेही कमी होऊ दिलेला नाही. गोव्याचं निसर्गरम्य सौंदर्य आणि सायबर तपासाचं आधुनिक जग यांचा सुंदर ताळमेळ त्यांनी साधला आहे. पार्श्वसंगीत प्रसंगानुरूप परिणामकारक ठरतं. एडिटिंग अत्यंत धारदार असल्यामुळे कथा रेंगाळत नाही. कॅमेरावर्कही मालिकेच्या दर्जात भर घालतो.
कुठे कमी पडते मालिका?
सगळं काही उत्तम असलं तरी काही त्रुटी स्पष्टपणे जाणवतात. खलनायक प्रत्येक वेळी पोलिसांना सहज चकवा देतो, काही तपास प्रक्रियांना फारसं महत्त्व दिलेलं दिसत नाही आणि वास्तवापेक्षा सिनेमॅटिक स्वातंत्र्य अधिक घेतल्याचं जाणवतं. काही भावनिक प्रसंगांना अधिक वेळ मिळायला हवा होता. विशेषतः प्रीतम आणि त्याच्या आजोबांमधील नातं अधिक प्रभावीपणे उलगडता आलं असतं. काही ट्विस्ट अचानक येतात आणि त्यामुळे त्यांचा भावनिक परिणाम अपेक्षेइतका होत नाही.
पाहावी की नाही?
जर तुम्हाला ‘Special Ops’, ‘Asur’, ‘The Family Man’ किंवा तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या क्राइम थ्रिलर मालिका आवडत असतील, तर त्या धाटणीची ‘प्रीतम अँड पेड्रो’ नाही. या सिरीजची जातकुळी वेगळी आहे. नर्म विनोदी आणि तरी रिलेटेबल आहे. समकालीन सायबर क्राइम आणि मानसिकतेवर भाष्य करणारी ही सिरीज आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. ही मालिका केवळ रहस्य उलगडत नाही, तर डिजिटल युगातील गुन्हे किती गुंतागुंतीचे झाले आहेत, याचीही जाणीव करून देते.
राजकुमार हिरानींची भावनिक शैली, अर्शद वारसीचा सहज अभिनय, विक्रांत मेसीचा प्रभावी खलनायक आणि वेगवान पटकथा या सगळ्यामुळे ही मालिका शेवटपर्यंत खिळवून ठेवते. काही सिनेमॅटिक स्वातंत्र्य आणि घाईघाईत उरकलेले प्रसंग खटकतात; पण एकूण अनुभव समाधानकारक ठरतो.
सिरीज का पाहावी ?
परफॉर्मन्स, वेगवान कथा आणि सतत वाढणारा सस्पेन्स यामुळे ही मालिका वीकेंड बिंजचा योग्य पर्याय.
का टाळावी ?
तपास प्रक्रियांना फारसं महत्त्व दिलेलं दिसत नाही आणि वास्तवापेक्षा सिनेमॅटिक स्वातंत्र्य अधिक
थोडक्यात काय ?
सायबर क्राइम, थरार, भावना आणि नर्म विनोद यांचा समतोल साधणारी ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही एक मनोरंजक वेबसीरिज आहे.
रेटिंग : ⭐⭐⭐✨ (3.5/5)
अमित भंडारी, समीक्षक
