R.B. Choudary : भारतीय चित्रपटसृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आर.बी. चौधरी यांचे एका रस्ते अपघातात निधन झाले आहे. मंगळवार (6 मे) उदयपूरजवळ झालेल्या एका कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या बातमीमुळे संपूर्ण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. आर.बी. चौधरी हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ‘जीवा’ (Jiiva) याचे वडील देखील होते. ते दीर्घकाळापासून चित्रपटसृष्टीशी जोडलेले होते आणि त्यांनी त्यांच्या ‘सुपर गुड फिल्म्स’ (Super Good Films) या बॅनरखाली अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली होती.
आर.बी. चौधरी यांनी 1988 मध्ये चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा पहिला तमिळ चित्रपट ‘पुधू वसंतम’ (Pudhu Vasantham) हा होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा आणि समीक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, तसेच या चित्रपटासाठी त्यांना ‘तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार’ देखील प्राप्त झाला. आर.बी. चौधरी यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक नामवंत दिग्दर्शकांना आणि कलाकारांना पाठिंबा दिला विशेष म्हणजे, त्यांनी दिग्दर्शक के.एस. रविकुमार यांच्या पहिल्याच चित्रपटाची ‘पुरियाधा पुधीर’ (Puriyaadha Pudhir) निर्मिती करून त्यांनाही भक्कम साथ दिली होती.
कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती
आर.बी. चौधरी यांचा शेवटचा चित्रपट ‘मारीचन’ (Maarichan) हा होता, जो जुलै 2025 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात ‘पुष्पा’ (Pushpa) फेम अभिनेता फहाद फासिल याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘लव्ह टुडे’ (Love Today), ‘जॉली’ (Jolly), ‘मिस्टर रोमियो’ (Mr. Romeo) आणि ‘एसीपी शिवा’ (ACP Shiva) हे आर.बी. चौधरी यांच्या काही अत्यंत लोकप्रिय चित्रपटांपैकी आहेत.
भारतातील सर्वात मोठे प्रादेशिक ओटीटी व्यासपीठ ‘स्टेज’ मराठीत दिमाखात दाखल-
आर.बी. चौधरी हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत मोठे आणि प्रतिष्ठित नाव होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला असून, लोक त्यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांचे पार्थिव शरीर 6 मे रोजी चेन्नई येथे नेण्यात येणार असून, तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, आर.बी. चौधरी यांनी तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये मिळून 100 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली होती.
