Marathi actress Aishwarya Shete: मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे ५ ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. मालिकांच्या धावपळीतून थेट नाट्यगृहाच्या मंचावर येण्याचा हा अनुभव तिच्यासाठी केवळ काम नसून एक ‘युनिव्हर्सिटी’ असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.
शूटिंगचे ‘क्विक डिलिव्हरी’ आणि नाटकाचे ‘लाईव्ह अनुभव’
आपल्या या पहिल्या वहिल्या नाटकाबाबत बोलताना ऐश्वर्या सांगते, “मालिकांच्या शूटिंगमध्ये आपल्याला पटकन प्रतिसाद द्यावा लागतो, कधीकधी ‘क्विक डिलिव्हरी’ करावी लागते. पण नाटकाच्या तालमींत एका वाक्याचे विविध अर्थ आणि हावभाव कसे बदलतात, हे शिकायला मिळतंय. मालिकांमधून प्रसिद्धी मिळते, पण नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या ‘लाईव्ह’ प्रतिक्रियांची जी ऊर्जा मिळते, ती काही वेगळीच आहे. मालिकेच्या सेटवर चुका सुधारण्यासाठी १०-१५ दिवस मिळतात, पण रंगमंचावर ‘वन टेक’ मध्ये सगळं परफेक्ट करायचं असतं, त्याची एक वेगळीच धाकधूक आणि एक्सायमेंट आहे!”
सुकन्या मोने-गिरीश ओक; प्रत्यक्ष आयुष्यातील ‘आई-बाबा’
या नाटकात सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक हे तिचे आई-बाबा साकारत आहेत. याबद्दल ती भावूक होऊन सांगते, “सुकन्या ताईंच्या मायेने आणि गिरीश सरांच्या अनुभवाने मला या भूमिकेत घडवलंय. तालमींच्या वेळी सुकन्या ताईंच्या ‘अलीबाबाच्या गुहेसारख्या’ असलेल्या बास्केटमधून सतत मिळणारे खाऊ आणि त्यांची आपुलकी यामुळे आमच्यात खरोखरच आई-मुलीचं नातं निर्माण झालंय. ही दिग्गज माणसं माझ्यासाठी एका विद्यापीठासारखी आहेत.”
‘निर्जीव फोन’ आणि ‘जिवंत संवाद’
नाटकाच्या विषयावर भाष्य करताना ऐश्वर्या तरुणाईला एक महत्त्वाचा संदेश देते: “आजच्या तरुण पिढीला सतत मोबाईल आणि टेक्नॉलॉजीची सवय लागली आहे. ‘निर्जीव फोन स्मार्ट झालाय आणि जिवंत माणूस बावळट’ असे एक वाक्य नाटकात आहे, जे आजचं भीषण वास्तव आहे. या नाटकातून आम्ही एकच संदेश देतोय – पालकांशी ‘ट्रान्सपरन्सी’ ठेवा आणि पालकांनी मुलांच्या चुकीवर भडीमार करण्यापेक्षा त्यांना समजून घेऊन ‘मी तुझ्यासोबत आहे’, हे आश्वासन द्या. हा ‘जनरेशन गॅप’ कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
मालिका विश्वात ज्या प्रेमाने प्रेक्षकांनी ऐश्वर्याला स्वीकारले, त्याच प्रेमाची अपेक्षा ती या नाटकासाठी व्यक्त करते. “हे नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर अनेक मुलींसाठी एक ताकद आहे. तरुण पिढीने आपल्या पालकांसोबत हे नाटक आवर्जून पाहावं आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावं, हीच माझी इच्छा आहे,” असे तिने सांगितले.
