Rajshri Deshpande : प्रेम, नाती आणि मैत्री यांची वेगळी बाजू उलगडणारा ‘बाप्या’ सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटातील संवेदनशील कथा, कलाकारांचा अभिनय आणि विशेषतः राजश्री देशपांडे हिचा अनोखा लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रेक्षकांना राजश्रीचा शैलजापासून शैलेशपर्यंतचा प्रवास प्रचंड भावत असून तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
आजवर अनेक चित्रपटांमध्ये स्त्री पात्रांनी पुरुषी वेष धारण केलेला पाहायला मिळाला असला, तरी ‘बाप्या’ मधील शैलजाचा प्रवास हा केवळ मेकअप किंवा बाह्य रूपापुरता मर्यादित नाही. एका व्यक्तीच्या आयुष्यात घडणारे मानसिक, भावनिक आणि शारीरिक बदल अत्यंत संवेदनशीलपणे या भूमिकेतून दाखवण्यात आले आहेत. कोणत्याही लिंगभेदाच्या पलीकडे जाणाऱ्या नात्याची आणि मैत्रीची हळवी बाजूही या कथेतून समोर येते.
राजश्री देशपांडेचा (Rajshri Deshpande) हा लूक प्रेक्षकांना विशेष भावत आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, देहबोली, बोलण्यातील बदल आणि व्यक्तिरेखेतील सहजता यामुळे शैलजा ते शैलेश हा प्रवास अधिक प्रभावी ठरतो. या भूमिकेसाठी राजश्रीने मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर प्रचंड मेहनत घेतली आहे. नुकताच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओही व्हायरल झाला असून त्यामध्ये शैलजापासून शैलेशपर्यंतचा तिचा संपूर्ण प्रवास पाहायला मिळत आहे. या व्हिडीओलाही प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते.
या भूमिकेबद्दल बोलताना राजश्री देशपांडे म्हणते, ‘’शैलजा ते शैलेश हा प्रवास माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आणि तितकाच समृद्ध करणारा होता. बाहेरून दिसणारा लूक बदलणं हा त्यातला फक्त एक भाग होता. त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं असेल, तिची भावनिक घालमेल, स्वतःला स्वीकारण्याची प्रक्रिया आणि समाजाकडे पाहाण्याचा बदलता दृष्टिकोन हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं होतं. प्रत्येक टप्प्यावर शैलजा बदलत जाते आणि तो बदल फक्त दिसण्यात नाही तर तिच्या वागण्यात, बोलण्यात आणि विचारांमध्येही जाणवतो.’’
देशात आर्थिक वादळ पण पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटण्यात व्यस्त ; राहुल गांधी PM मोदींवर भडकले
वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत ‘बाप्या’ या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर तिवारी यांनी केले असून मुक्तल तेलंग आणि समीर तिवारी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार श्रीकांत यादव, आर्यन मेंगजी आणि गौरी किरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्वत्र प्रदर्शित झालेल्या ‘बाप्या’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
