Ramayana Part 1 : नवरात्रीच्या पहिल्या शुभदिनी ‘रामायणम्’च्या (Ramayana) निर्मात्यांनी चित्रपटातील भगवान राम यांच्या भूमिकेतील रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवी, लक्ष्मणाच्या भूमिकेतील रवी दुबे आणि रावणाच्या भव्य रूपातील रॉकिंग स्टार यश यांचे नवे एन्सेम्बल पोस्टर प्रदर्शित केले आहे. यासोबतच दोन भागांत साकारल्या जाणाऱ्या या महाकाव्याचा पहिला भाग 5 नोव्हेंबर 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी दिला खास संदेश — “हा रामयुगाचा आरंभ आहे!” या घोषणेमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे. ‘रामायणम्’च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही घोषणा केली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे: “नवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर आम्ही एका नव्या युगाच्या सुरुवातीचा उत्सव साजरा करत आहोत. हा रामयुगाचा आरंभ आहे ! नमित मल्होत्रा यांचा ‘रामायणम्: पार्ट 1’ 5 नोव्हेंबरपासून जगभरातील चित्रपटगृहांत सर्व प्रीमियम फॉरमॅट्समध्ये प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात होईल.”
नव्या पोस्टरमध्ये रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर रॉकिंग स्टार यश याचे रावणाच्या भव्य रूपातील दर्शन घडते. पोस्टरमध्ये या प्रमुख पात्रांमधील दृश्यात्मक विरोधाभास प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. भव्य सेट्स, लक्षवेधी वेशभूषा आणि बारकाईने केलेली सजावट या दोन भागांत साकारल्या जाणाऱ्या महाकाव्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्य विश्वाची झलक दाखवतात.
या घोषणेचा मुहूर्तही विशेष महत्त्वाचा आहे. नवरात्रोत्सव हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. याच शुभदिनी करण्यात आलेल्या या घोषणेमुळे चित्रपटाच्या थिएटरमधील प्रवासाची अधिकृत सुरुवात झाली आहे. “हा रामयुगाचा आरंभ आहे” हा संदेश चित्रपटाच्या जागतिक प्रदर्शनापर्यंत वाढत जाणाऱ्या उत्साहाची नांदी ठरतो. ‘रामायणम्: पार्ट १’च्या अॅडव्हान्स बुकिंगला यंदाच्या दसऱ्यापासून सुरुवात होणार असून, त्यामुळे या भव्य चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता आणखी वाढणार आहे.
जगातील सर्वाधिक पूजनीय महाकाव्यांपैकी एक असलेल्या ‘रामायणम्’ची भव्य कथा आता मोठ्या पडद्यावर साकारली जाणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता, रॉकिंग स्टार यश रावण, सनी देओल हनुमान आणि रवी दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकांत दिसणार आहेत.
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘रामायणम्’ची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओजने आठ ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या DNEG आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने केली आहे.
हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग ५ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळीच्या मुहूर्तावर, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये जगभरात प्रदर्शित होईल. हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भारत वगळता जगभरातील प्रदर्शनाची जबाबदारी सोनी पिक्चर्स सांभाळणार आहे, तर हिंदी भाषिक बाजारपेठेत धर्मा प्रॉडक्शन्स चित्रपटाचे वितरण करणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये IMAX फॉरमॅटमध्येही प्रदर्शित होणार आहे.
