बॉलिवूडमधील यंदाच्या सर्वात (Ramayan) महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टपैकी एक मानल्या जाणाऱ्या ‘रामायण’ या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर सध्या जोरदार वाद होत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी, सनी देओल आणि रवी दुबे यांसारखी मोठी स्टारकास्ट आहे. मात्र अलीकडे रणबीर कपूरचा भगवान रामाच्या भूमिकेतील लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रणबीर कपूर भगवान रामाच्या अवतारात दिसत आहे. त्याने केशरी धोतर आणि जानवे परिधान केलेले आहे. मात्र त्याचा पूर्ण चेहरा स्पष्ट दिसत नाही. कपड्यांपेक्षा त्याच्या डोक्यावरचा विग अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत हा विग कृत्रिम वाटत असल्याचे म्हटले आहे. इतक्या मोठ्या बजेटच्या चित्रपटात लूककडे अधिक बारकाईने लक्ष द्यायला हवे होते, अशी टीका काहींनी केली.
राम चरणने पूर्ण केलं पेड्डीचं डबिंग; मेकर्सने शेअर केला BTS व्हिडिओ
काही नेटिझन्सनी या लूकची तुलना आदिपुरुष या चित्रपटाशी केली. ‘बनावट केस आणि दाढी’च्या बाबतीत बॉलिवूडने आधीच्या चुका अजूनही सुधारलेल्या नाहीत, अशी टीका सोशल मीडियावर होत आहे. निर्माते नमित मल्होत्रा यांनी चित्रपटाच्या भव्यतेबाबत केलेल्या दाव्यांवरही काहींनी टीका केली आहे. तर काहींनी “महेश बाबू रामाच्या भूमिकेसाठी अधिक योग्य ठरला असता,” असेही मत व्यक्त केले. एका युजरने तर “तो भगवान रामापेक्षा शकुनी मामांसारखा दिसत आहे,” अशी टीका केली आहे.
‘रामायण’ हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणारा भव्य चित्रपट आहे. हा चित्रपट प्राइम फोकस स्टुडिओज आणि ऑस्कर विजेते VFX स्टुडिओ DNEG यांच्या सहकार्याने तयार होत आहे. तसेच अभिनेता यशच्या ‘मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स’चीही साथ आहे. पहिला भाग दिवाळीमध्ये तर दुसरा भाग पुढच्या दिवाळीमध्ये आयमॅक्स फॉरमॅटमध्ये प्रदर्शित करण्याचा प्लॅन आहे. प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सध्या लीक झालेल्या फोटोमुळे निर्माण झालेला वाद हा अधिकृत टीझर किंवा ट्रेलर येईपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे निर्माते आणि कलाकार यांनी याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
