Saraswati Education Society : महाराष्ट्राचा गौरवशाली ‘शिव इतिहास’ घडला तो सह्याद्रीच्या साक्षीने आणि कर्त्या व्यक्तींच्या असामान्य कर्तृत्वाने ! त्यात कर्त्या स्त्रियांचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. अशाच स्त्रियांपैकी एक म्हणजे महाराणी ताराराणी! ‘स्वराज्याची वीरांगना, मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी’ असे ज्यांचे वर्णन केले गेले आहे, अशा महाराणी ताराराणींची गाथा आता मराठी रंगभूमीवर पहायला मिळणार आहे.
आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) (Shri Chhatrapati Shivaji Smarak Mandal) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने (Saraswati Education Society) पुढाकार घेतला आहे. युवराज पाटील (Yuvraj Patil) लिखित आणि विजय राणे (Vijay Rane) दिग्दर्शित रणरागिणी ताराराणी या नाटकाचा शुभारंभ येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर येथे होणार आहे.
चंद्रकांत सावंत हे या नाटकाचे मार्गदर्शक तर ब्रिगेडियर सुधीर सावंत हे रणरागिणी ताराराणी नाट्यनिर्मितीचे संकल्पक आहेत. “ताराराणींचा इतिहास हा जनसामान्यांपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यांचा प्रचंड पराक्रम नव्या पिढीपर्यंत येणे गरजेचे आहे. आपला देदीप्यमान इतिहास जगभरात पोहचावा; या उद्देशाने आम्ही या नाटकाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे,” असे सरस्वती एज्युकेशन सोसायटी व श्री शिवाजी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले.
मराठेशाहीचे स्थैर्य आणि छत्रपती ताराराणी यांनी समर्थपणे राखलेली मराठेशाहीची गादी यावर आधारित असलेल्या रणरागिणी ताराराणी या नाटकात 50 कलाकारांची फ़ौज असणार आहे. “नाटकात काम करायचं, या डेडिकेशनने नाटकातल्या प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका प्रामाणिकपणे केली आहे. रंगमंचावर या नाटकाच्या निमित्ताने एक वेगळा देखणा प्रयोग पहायला मिळणार आहे. जो रसिकांना वेगळा आनंद देईल,” असा विश्वास दिग्दर्शक विजय राणे यांनी व्यक्त केला.
“ऐतिहासिक संदर्भ घेत हा प्रेरणादायी लढा रसिकांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही केला असून त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभेल,” असा विश्वास लेखक युवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
तनीषा वर्दे (ताराराणी), कृष्णा राजशेखर (येसूबाई), सिद्धी घैसास (जानकी), चेतन म्हस्के (शंभूराजे), अरुण पंदरकर (राजाराम), उमेश ठाकूर (संताजी/रामाजी/ मिरखान), ऋषिकेश जोशी (धनाजी), सुनील गोडसे (औरंगजेब), मोहिका गद्रे (चेन्नमा/झीनत), मुकुल देशमुख (जुल्फीकार) आदि कलाकारांच्या रणरागिणी ताराराणी या नाटकात भूमिका आहेत.
श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटी निर्मित,अद्वैत थिएटर्स प्रकाशित रणरागिणी ताराराणी नाटकाचे व्यवस्थापन हरी पाटणकर सांभाळत आहेत. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) मुंबई ही संस्था गेली ८२ वर्ष शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक,आरोग्य अशा विविध क्षेत्रात लक्षवेधी कार्य करीत आहे.
‘पाहुणे येत आहेत पोरी…,’ स्थळ चित्रपटातलं गाणं सोशल मीडियावर हिट
या संस्थेतर्फे दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदाच्या शिवजयंतीला रणरागिणी ताराराणी या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, येथे दुपारी 3.30 वा. रंगणार आहे.