मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध मराठी (Marathi) अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील यांचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील हे नाव मराठी मनोरंजन विश्वातल्या काही आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक. गेल्या काही वर्षांपासून ते मराठी मालिका, सिनेमा आणि नाटक विश्वात सक्रीय होते.
रणजित पाटील यांनी मराठी मालिकाविश्व आणि रंगभूमीमार्फत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. तसेच, त्यांनी अनेक तरुण रंगकर्मींना प्रोत्साहन देत, मार्गदर्शन देण्याचंही काम केलं. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून तरुण कलाकारांनाही प्रोत्साहन दिलं. रणजित पाटील यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचं दिग्दर्शन त्यांनी केलंय.
हमाल दे धमाल; चित्रपटाच्या रम्य आठवणींना उजाळा, `विशेष शोला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दिग्दर्शन व्यतिरिक्त त्यांनी आपल्या अभिनयाचं नाणंही खणखणीत वाजवलं. झी मराठीवरील ‘ह्रदय प्रीत जागते’, या मालिकेत रणजीत यांनी उत्तम अभिनय केला होता. त्यांच्या पात्राचं आणि अभिनयाचं कौतुकही झालं होतं. या मालिकेत त्यांनी साकारलेली ‘अंकल’ ही भूमिका विशेष गाजली. रणजित यांनी रुईया महाविद्यालयातील अनेक एकांकिकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. रणजितच्या निधनामुळे मराठी कलाकार आणि अनेक रंगकर्मी हळहळ व्यक्त करत आहेत. युवा कलाकारांचा भक्कम आधारस्तंभ हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील अभिनेत्री समृद्धी साळवीनं रणजित पाटील यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट शेअर केली आहे. “मला आज रंगभूमीबद्दल जे काही थोडंफार माहिती आहे, त्याचं श्रेय तुझं आहे. संवाद कसे बोलायचे, प्रयोगादरम्यानचा मंचावरचा वावर… हे सगळं काही तू शिकवलंस दादा. जे काही झालंय ते खूप Unfair आहे कारण, आमच्यासारख्या अजून कित्येक नवख्या मुलांना तुझी गरज होती… मी तुझी विद्यार्थी म्हणून कायम ओळखली जाईन… दादा मिस यू! पोतदारचं ऑडिटोरियम तुझ्याशिवाय अपूर्ण आहे…”, अशा भावना समृद्धी साळवीनं व्यक्त केल्या आहेत.
