Saif Ali Khan had become nervous : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा काम करतानाचा खास किस्सा सांगितला आहे. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Eklavya: The Royal Guard’ या चित्रपटात सैफ आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केलं होतं. मात्र, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करायची असल्याने आपण सुरुवातीला खूप नर्व्हस होतो, अशी कबुली सैफने दिली आहे.
सैफ अली खान लवकरच अक्षय कुमारसोबत ‘Kaun Banega Crorepati’च्या आगामी भागात दिसणार आहे. दोघेही त्यांच्या ‘Haiwaan’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये सहभागी होणार आहेत. याचवेळी सैफने अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या पहिल्या चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. ‘Eklavya: The Royal Guard’च्या शूटिंगदरम्यान सैफकडे मोठे संवाद होते. त्यामुळे तो ते संवाद व्यवस्थित पाठ करून शूटिंगची तयारी करत होता.
दुसऱ्या दिवशी अमिताभ बच्चन यांच्या सीनचं शूटिंग असताना त्यांनी सैफला केवळ ‘क्यू’ देण्यास सांगितलं. मात्र, त्यानंतर बिग बींनी त्याला संपूर्ण संवादच म्हणायला सांगितला आणि सैफची चांगलीच धांदल उडाली. या प्रसंगाची आठवण सांगताना सैफ म्हणाला, “माझे संवाद खूप मोठे होते, त्यामुळे मी ते शिकत होतो. दुसऱ्या दिवशी अमितजींचा सीन होता. ते मला म्हणाले, ‘सैफ, फक्त मला क्यू दे.’ त्यानंतर त्यांनी मला संपूर्ण संवाद म्हणायला सांगितला. तेव्हा माझ्या मनात आलं, ‘देवाचे आभार, मी तयारी केली होती.’”
नांगरे पाटलांचे घूमजाव, नागपुरात सरसकट DJ बंदी नाहीच
अमिताभ बच्चन यांची मोठी कारकीर्द, त्यांचा प्रभाव आणि अभिनय क्षेत्रातील स्थान यामुळे त्यांच्यासोबत पहिल्यांदा काम करणं आपल्यासाठी सुरुवातीला थोडं दडपणाचं होतं, असंही सैफने सांगितलं. ‘Eklavya: The Royal Guard’चं दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केलं होतं. राजघराण्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन आणि सैफ अली खान एकत्र पडद्यावर झळकले होते.
दरम्यान, सैफ आता ‘Haiwaan’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियदर्शन यांच्यासोबतचा सैफचा हा पहिलाच चित्रपट आहे. विशेष म्हणजे तब्बल 18 वर्षांनंतर सैफ अली खान आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. 11 सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘Haiwaan’मध्ये सैफ दृष्टिहीन व्यक्तीची भूमिका साकारत असून, या चित्रपटातून तो एका वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.
