नगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक’ ही एकांकिका स्पर्धा बुधवारपासून सावेडीतील माऊली सभागृहात सुरू झाली. यंदाचं स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील 27 संघ सहभागी झाले आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईक हिच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराज पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले.
आज अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. या दिवशी देखील या स्पर्धेत सकाळी 10 ते रात्री 10 यावेळेत एकांकिका सादर होत आहेत. आज आठ एकांकिका सादर होत आहेत. आजच्या दुसऱ्या दिवशी देखील या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी देखील या स्पर्धेत आठ एकांकिका सादर करण्यात आल्या होत्या. तर उद्या या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे.
अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित, आय लव्ह नगरच्या संयुक्त विद्यमाने आणि कलर्स मराठी वाहिनीच्या सहयोगाने ही स्पर्धा सुरू आहे. लेट्सअप हे या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर आहेत. या एकांकिका स्पर्धेचं यंदाचं उत्सव रंगभूमीचा, अभिमान दशकपूर्तीचा हे ब्रीदवाक्य आहे.
कलर्स मराठी वाहिनीचा सहयोग यंदाच्या अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेला लाभला आहे. दीप प्रज्वलन व नटराज पूजन कार्यक्रमाला अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, स्पर्धेचे परीक्षक दिग्दर्शक- रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे, लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री प्रतीक्षा जाधव, श्रीपाल शिंगी, स्वप्नील मुनोत, पुष्कर तांबोळी, अभिजित दळवी, अमोल खोले, हर्षल बोरा आदी उपस्थित होते.