Gypsy Movie Upcoming Soon: नुकतचं ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल’ (Pune International Film Festival) मध्ये “जिप्सी” (Gypsy Movie) हा चित्रपट दाखविण्यात आला होता. (Marathi Movie) या चित्रपटातील “जोत्या’ नावाच्या एका डोंबाऱ्याच्या लहान मुलाची भूमिका अतिशय चोखपणे पार पाडणाऱ्या अवघ्या 7 वर्षाच्या कबीर खंदारे (Kabir Khandare) या बालकलाकराला “स्पेशल ज्युरी मेन्शन बेस्ट ॲक्टर” (Special Jury Mention Best Actor) या सन्मानाने गौरविण्यात आले. प्रेक्षकांबरोबरच अनेक समीक्षक, पत्रकार आणि मान्यवरांनी कबीरचे खूप तोंडभरून कौतुक केलं आहे.
कबीरच्या अभिनयाची सुरुवात खरं सांगायचं तर तो त्याच्या आईच्या पोटात अवघ्या सहा महिन्याचा असतानाच झाली. पुण्यातील एका दिग्दर्शकाला एक गर्भवती स्त्रीच्या भूमिकेसाठी एका कलाकराची गरज होती त्यावेळी कबीरच्या आईने तो रोल केला होता. त्याच्यानंतर अगदीच काही महिन्याचा असताना महेश खंदारे दिग्दर्शित “मारेकरी” या शॉर्ट फिल्ममध्ये त्याने लहान बाळाचे काम केलं.
त्यानंतर दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांच्या “द लास्ट पफ” नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये साधारणतः एक वर्षाचा असताना त्यांने काम केलं होतं. त्याने आता पर्यंत अनेक नामांकित दिग्दर्शकांसोबत लघुपट, जाहिराती, माहितीपट तसेच नुकत्याच एका हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केली आहे. दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे दिग्दर्शित “सुरमा” या लघुपटामध्ये त्यांने एक महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे, त्या भूमिकेसाठी कबीरला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवांमध्ये चार वेळा “बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट” म्हणून गौरविण्यात आला आहे.
‘जिप्सी’ चे दिग्दर्शक शशि चंद्रकांत खंदारे यांना कबीरच्या इतक्या निरागस अभिनयाच्या पाठीमागचं रहस्य काय आहे? असं विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, मुळातच कबीर हा अतिशय उत्तम अभिनेता आहे. आणि त्याला अभिनयाची खूप आवड आहे. त्याला एखादी गोष्ट कशी करायची हे करून दाखवलं की, त्याच्यापेक्षा अतिशय उत्तम पद्धतीने तो साकारतो. त्याचबरोबर अभिनयासाठी असणारी सोशिकता, सहनशक्ती त्याच्याकडे खूप आहे. शूटिंग दरम्यान सोलापूरच्या जवळजवळ ४२ डिग्री तापमानामध्ये आम्ही शूट करत होतो आणि त्याच्या कॅरेक्टर नुसार सुरुवातीचे काही सिन त्याच्या पायामध्ये चप्पल नाही. तर जवळजवळ सलग बारा दिवस तो अनवाणी पायाने जंगल, माळरान, डांबरी रोड, गावभर चेहऱ्यावरती किंचितही वेदना न दाखवता फिरत होता.
सोबतच कोकणामध्ये आम्ही पावसाचा सिक्वेन्स वेगवेळ्या वेळेस सलग आठ दिवस शूट केला आहे. तर पावसात भिजत त्याने ते सीन दिले आहेत. एक वेळ तर अशी होती की सिनेमाचा आम्ही महत्त्वाचा भाग शूट करत होतो, आणि सलग भिजल्यामुळे तो आजारी पडला होता. पण आम्हाला शूट थांबवणं शक्य नव्हतं, तर आम्ही पहाटे चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पावसात शूट करत होतो. तर आम्ही त्याला शॉट झाला की जनसेटच्या मागे उब लागण्यासाठी उभं करायचो. कित्येक शॉट त्याला औषध पाजून घेतले आहेत. सध्या कबीरला नामांकित दिग्दर्शक आणि प्रोडक्शन हाऊसचे मुख्य भूमिका असलेले दोन चित्रपट मिळाले आहेत. नुकतीच त्यातल्या एका चित्रपटाची लुक टेस्ट झाली आहे.