प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची ‘शूट अ शॉट’ लघुपट कार्यशाळा

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसांची ‘शूट अ शॉट’ लघुपट कार्यशाळा आयोजित.

Untitled Design   2026 01 23T141506.795

Untitled Design 2026 01 23T141506.795

‘Shoot a Shot’ short film workshop by renowned director Umesh Kulkarni : चित्रपटसृष्टीत नव्या पिढीला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसांची ‘शूट अ शॉट’ लघुपट कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

ही कार्यशाळा दिनांक 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील चित्रांगण सभागृहात पार पडणार आहे. चित्रपट निर्मितीची मूलभूत संकल्पना ते प्रत्यक्ष चित्रीकरणापर्यंतचा प्रवास या कार्यशाळेत सहभागींसाठी प्रत्यक्ष उदाहरणांसह उलगडून सांगण्यात येणार आहे.

‘शूट अ शॉट’ या संकल्पनेतून एका दृश्यामागील विचार, त्याची रचना, कॅमेऱ्याची मांडणी, कलाकारांचे अभिनयदर्शन, प्रकाशयोजना आणि दृश्यभाषा यांचा सखोल अभ्यास करण्यात येणार आहे. लघुपटाच्या माध्यमातून प्रभावी कथा कशी मांडावी, मर्यादित साधनांमध्ये सर्जनशीलता कशी साधावी, तसेच दिग्दर्शक म्हणून निर्णयप्रक्रिया कशी असते, याबाबत उमेश कुलकर्णी स्वतः मार्गदर्शन करणार आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील दिग्दर्शन शैलीसाठी ओळखले जाणारे उमेश कुलकर्णी यांनी ‘वल्लू’, ‘विहीर’, ‘देऊळ’, ‘कासव’, ‘उलाढाल’ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ या कार्यशाळेमध्ये नवोदित दिग्दर्शक, चित्रपट अभ्यासक, विद्यार्थी तसेच लघुपट निर्मितीत रस असणाऱ्या तरुणांना मिळणार आहे.

चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांना व्यावहारिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, तसेच राज्यातील नव्या प्रतिभेला व्यासपीठ देणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या उपक्रमामुळे लघुपट निर्मितीच्या क्षेत्रात नव्या प्रयोगांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नावनोदणी आणि अधिक तपशीलासाठी
8600918147,9028192475,9167677801 संपर्क करावा.

जनसंपर्क विभाग
दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव
वृत्तनिवेदन
04/2026

Exit mobile version