Swayambhu : ‘स्वयंभू’चा (Swayambhu) टीझर प्रदर्शित झाल्यापासून ही फिल्म निखिल सिद्धार्थच्या सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक ठरली आहेय विशेषतः ‘कार्तिकेय 2’च्या यशानंतर. भव्यता, मोठा स्केल आणि दमदार कथानकाची झलक दाखवणाऱ्या या टीझरचं त्याच्या सिनेमॅटिक दृष्टिकोनासाठी भरभरून कौतुक करण्यात आलं. चित्रपटाबद्दल वाढत्या उत्सुकतेदरम्यान त्यातील पहिलं गाणं ‘रा रा धीवरा’देखील मोठं हिट ठरलं आहे.
हा एक मेगा प्रोजेक्ट असल्याने चित्रपटाचं चित्रीकरण कठीण भागांमध्ये आणि दुर्गम जंगलांतील वास्तविक लोकेशन्सवर करण्यात आलं. याबाबत बोलताना दिग्दर्शक भरत कृष्णमाचारी ( Bharat Krishnamachari) म्हणाले, लाइव्ह-अॅक्शन भागांसाठी आम्ही आंध्र प्रदेशातील राजामुंद्रीजवळच्या मारेडुमिल्ली जंगलांची निवड केली. तो परिसर आहे जिथे ‘पुष्पा’मधील जंगलातील सीक्वेन्स शूट करण्यात आले होते. मात्र आम्ही खास करून अशा अनस्पर्शित जागा निवडल्या आहेत. जिथे यापूर्वी कधीच शूटिंग झालं नव्हतं.
ते पुढे म्हणाले, त्या ठिकाणी पोहोचणं स्वतःमध्ये एक मोठं साहस होतं. डोंगराच्या शिखरावर पोहोचण्यासाठी आम्हाला सुमारे 2 ते 2.5 तास जीपने प्रवास करावा लागत होता. अशाच एका शेड्यूल दरम्यान अचानक पाऊस सुरू झाला आणि आमच्या टीममधील काही सदस्य आवश्यक सामानाशिवाय जवळपास एक-दोन दिवस डोंगरावर अडकून पडले होते. ते म्हणाले, विशेष म्हणजे, त्या सुंदर आणि अनस्पर्शित लोकेशनवर शूटिंग करण्याची परवानगी मिळवणाऱ्या सुरुवातीच्या टीम्सपैकी आमची टीम एक होती.
‘स्वयंभू’चा टीझर भारताच्या गौरवशाली सुवर्णयुगाच्या पार्श्वभूमीवर आधारित कथा दाखवतो, जी वारसा, शौर्य आणि सांस्कृतिक महत्त्वाने परिपूर्ण आहे. कथानकाच्या केंद्रस्थानी ‘सेंगोल’चं प्रभावी प्रतीक दिसून येतं, जे परंपरा आणि सन्मानाची कथा सूचित करतं. निखिल सिद्धार्थ या चित्रपटात अत्यंत प्रभावी आणि दमदार अवतारात दिसत आहेत, तर टीझर भव्य दृश्यं, गडद नाट्य आणि जबरदस्त अॅक्शनने भरलेला आहे.
‘स्वयंभू’साठी इंडस्ट्रीतील अनेक मोठे टेक्निशियन आणि क्रिएटिव्ह टॅलेंट एकत्र आले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन भरत कृष्णमाचारी यांनी केलं आहे. चित्रपटाला संगीत रवि बसरूर यांचं असून ते ‘केजीएफ’ आणि ‘सालार’साठी प्रसिद्ध आहेत. अप्रतिम दृश्यांसाठी छायाचित्रण केके सेंथिल कुमार यांनी केलं आहे, ज्यांनी ‘बाहुबली’ आणि ‘आरआरआर’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर एडिटिंग तम्मिराजू यांनी केली असून ते ‘बाहुबली’शी संबंधित राहिले आहेत. तब्बल 170 दिवस चाललेल्या शूटिंगमुळे हा प्रोजेक्ट अलीकडच्या काळातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.
‘स्वयंभू’ची निर्मिती भुवन आणि श्रीकर यांनी पिक्सल स्टुडिओजच्या बॅनरखाली केली आहे. भारताच्या समृद्ध इतिहासाला आणि शाश्वत गौरवाला समर्पित भव्य प्रस्तुती म्हणून तयार करण्यात आलेला हा चित्रपट समर 2026 मध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.
