Eetha Movie : मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या एका वेगळ्या सांस्कृतिक विश्वाची ओळख प्रेक्षकांना होणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटातून महाराष्ट्राच्या पारंपरिक तमाशा कलेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा आणि या कलेशी जोडलेल्या कलाकारांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी केवळ मनोरंजनावर भर न देता तमाशा संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आहे. या कलेतील बारकावे, परंपरा आणि कलाकारांचे जगणे समजून घेण्यासाठी विशेष संशोधन करण्यात आले आहे.
‘ईठा’ या चित्रपटाची संकल्पना कशी सुचली, याबाबत लक्ष्मण उतेकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘छावा’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी ‘तमाशा: विठाबाईच्या आयुष्याचा’ हे मराठी पुस्तक वाचले होते. त्यातील एका व्यक्तिरेखेने त्यांना प्रभावित केले आणि त्यातूनच ‘ईठा’ची कल्पना आकाराला आली. मात्र, हा चित्रपट संपूर्ण पुस्तकावर आधारित नसून त्यातील एका व्यक्तिरेखेपासून प्रेरित आहे. विठाबाई यांच्या आयुष्यातील केवळ दोन घटनांचा आधार घेऊन चित्रपटाची कथा विकसित करण्यात आल्याचे उतेकर यांनी स्पष्ट केले.
या चित्रपटाची कथा 1943 ते 1980 या कालखंडात घडते. जवळपास चार दशकांचा प्रवास उलगडताना त्या काळातील सामाजिक बदल, सांस्कृतिक वातावरण आणि तमाशा कलेशी संबंधित कलाकारांचे संघर्ष प्रेक्षकांसमोर मांडले जाणार आहेत. तमाशाच्या पारंपरिक स्वरूपापासून ते त्यामागील कलात्मक बाजू आणि कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत अनेक पैलूंना चित्रपटात स्थान देण्यात आले आहे. मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये फारशी न दाखवलेली ही सांस्कृतिक दुनिया ‘ईठा’च्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून ‘स्त्री’च्या यशानंतर त्या पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘छावा’च्या ऐतिहासिक यशानंतर लक्ष्मण उतेकर यांनी यावेळी वेगळ्या विषयाची निवड केली आहे. दिनेश विजान, लक्ष्मण उतेकर आणि करिश्मा शर्मा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून मॅडॉक फिल्म्स आणि कठपुतली क्रिएशन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ईठा’ हा चित्रपट 4 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
