Abir Movie : ‘अबीर’ चित्रपटातील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ गाण्यात लावणीचा ठसकेबाज ठेका!

Abir Movie :  मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण जीवनाचा बाज, नात्यांमधील भावबंध, सामाजिक वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालणारा

Abir Movie

Abir Movie

Abir Movie :  मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण जीवनाचा बाज, नात्यांमधील भावबंध, सामाजिक वास्तव आणि मनोरंजन यांची सांगड घालणारा ‘अबीर’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच त्यातील कथानकात रंगांची उधळण, भावनांचे विविध पदर आणि नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार आहेत. चित्रपटातील गाणीही कथानकाला साजेसा रंगतदार बाज घेऊन येत आहेत. अशातच ग्रामीण वातावरण, गावातील कार्यक्रमाची लगबग आणि लावणीच्या ठेक्याने रंगणारी मैफल यांची अनुभूती देणारे ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘अबीर’ 18 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सुदेश वसंतराव झावरे पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. आकाश विष्णू शिंदे यांनी ‘अबीर’ची पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटातील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ या गाण्याचे बोल ‘जाते जिथं जिथं बाई…’ असे आहेत. या गाण्यात गावातील कार्यक्रमात आमदारांचे आगमन होते आणि त्यानंतर लावणीच्या सादरीकरणाने वातावरणात चैतन्य संचारते. नृत्यांगना मानसी शिंदे हिच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले असून, तिच्या नृत्याविष्कारातून लावणीचा ठसका आणि अदाकारीचा नजाकतदार आविष्कार पाहायला मिळतो. गावातील कार्यक्रमाची पार्श्वभूमी, उपस्थितांची उत्सुकता आणि लावणी सुरू होताच रंगत जाणारी मैफल यांमुळे गाण्याला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.

वैभव देशमुख यांच्या शब्दरचनेतून गाण्याला लावणीस साजेसा बाज लाभला आहे, तर रोहित नागभिडे यांच्या संगीताने ठेक्याला धार आणि सादरीकरणाला लयबद्ध ऊर्जा दिली आहे. राधा खुडे यांच्या आवाजातील ठसकेबाज सादरीकरण गाण्याचा रंग अधिक खुलवते. सुजित कुमार यांच्या नृत्यदिग्दर्शनातून मानसी शिंदेच्या हालचाली, लयकारी आणि अदाकारी यांचा मेळ साधण्यात आला आहे. लावणीचा ठेका, संगीताची चाल आणि नृत्याची रंगत यांमुळे हे गाणे गावच्या जत्रेतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रमातील जल्लोषाची आठवण करून देते. ‘अबीर’मध्ये मनोरंजनासोबतच कथानकातील भावनिक आणि नाट्यमय पदर उलगडण्याची उत्सुकताही निर्माण झाली आहे. हे गाणे कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारे असून, चित्रपटाला गती प्रदान करणारे आहे.

पायल जाधव, निखिल चव्हाण, देविका दफ्तरदार, अविनाश नारकर, गणेश देशमुख, प्राजक्ता हनमघर, गार्गी फुले, यश डिंबळे, रोशन सुनील राऊत, प्रशांत नेटके, गायत्री सुदेश झावरे, रेखा दहातोंडे, राजवर्धन झावरे आणि साईराज केंद्रे यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनीही विशेष भूमिका साकारली आहे. छायांकन निशांत भागवत यांचे आहे, तर अमित खंडागळे आणि सचिन नागरे यांनी सह-दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी निलेश गावंड यांनी पार पाडली आहे. रोहित नागभिडे यांनी संगीतासोबत पार्श्वसंगीतही दिले असून, आर्या आंबेकर, वैशाली माडे आणि राधा खुडे यांनी चित्रपटातील गीतांना आपला आवाज दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा BMC आयुक्तांना दणका, मिळणार नाही नोव्हेंबरचं वेतन; कारण काय?
सुजित सुरवसे यांनी रंगभूषा, स्नेहल नार्वेकर यांनी वेशभूषा, महेश गोरे यांनी कला दिग्दर्शन, विकास खंदारे यांनी ध्वनी संयोजन आणि स्वरूप जोशी यांनी ध्वनी संकलन केले आहे. विष्णू घोरपडे यांनी प्रॉडक्शनची जबाबदारी सांभाळली असून, कार्यकारी निर्माता मंगेश भिमराज जोंधळे (प्रसिद्धी आणि वितरण) आहेत. प्रोजेक्ट हेड अभय वाव्हळ असून लाईन प्रोडक्शनचे काम प्रतिभा चव्हाण यांनी पाहिले आहे. अशा अनुभवी कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सहभागामुळे ‘अबीर’च्या संगीताची आणि चित्रपटाच्या एकूण सादरीकरणाची उत्सुकता वाढली आहे.

 

Exit mobile version