अंबाबाईचं दर्शन घेऊन कोल्हापुरात शूटिंगची सुरुवात केली – मंदार जाधव

झी मराठीच्या ‘धाकट्या सुनबाई’ या मालिकेत वेदांत पटवर्धन ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. हा आजच्या पिढीचा सुशिक्षित, सुसंस्कृत तरुण आहे.

Untitled Design   2026 10 03T124145.410

Untitled Design 2026 10 03T124145.410

Started shooting in Kolhapur : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारा प्रतिभावान अभिनेता मंदार जाधव आता झी मराठीच्या ‘धाकट्या सुनबाई’ या मालिकेत तो वेदांत पटवर्धन ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. वेदांत हा आजच्या पिढीचा सुशिक्षित, सुसंस्कृत तरुण आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मंदार पहिल्यांदाच झी मराठीसोबत काम करत असून, या नव्या प्रवासाबद्दल आणि त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल त्याच्याशी साधलेला हा संवाद.‘धाकट्या सुनबाई’ मध्ये मी वेदांत पटवर्धन ही व्यक्तिरेखा साकारत आहे. वेदांत हा आजच्या पिढीचा मुलगा आहे. तो सुशिक्षित, सुसंस्कृत आहे. आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणारा, प्रत्येकाला सांभाळून घेणारा आणि सर्वांचा आदर करणारा असा हा मुलगा आहे.

वेदांतच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे तो अन्याय किंवा अत्याचार कधीच सहन करत नाही. त्याच्या समोर कोणावर अन्याय होत असेल, तर तो त्याविरोधात ठामपणे उभा राहतो. अगदी आपल्या कुटुंबाच्या विरोधात जावं लागलं तरी योग्य गोष्टीसाठी तो मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलामध्ये असावा असा आणि प्रत्येक मुलीला आपला जोडीदार असा असावा वाटेल, अशी ही व्यक्तिरेखा आहे.मला झी मराठीसोबत काम करण्याची इच्छा होती; मात्र काही कारणांमुळे ते योग्य प्रकारे जुळून येत नव्हतं. ‘धाकट्या सुनबाई’ ही मालिका कोठारे व्हिजनची निर्मिती आहे. याआधीही मी कोठारे व्हिजनसोबत काम केलं आहे. त्यामुळे जेव्हा मला या मालिकेसाठी कॉल आला, तेव्हा मी लगेच होकार दिला.

मुंबईतील मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटल्याचा आरोप, फैयाज प्रेमजीविरोधात 700 पानी चार्जशीट

एक म्हणजे झी मराठीसोबत काम करण्याची संधी मिळत होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा महेश कोठारे सरांसोबत काम करण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे हा कॉल माझ्यासाठी खूप खास होता आणि माझा आनंद खरंच दुप्पट झाला होता.माझा नेहमीच प्रयत्न असतो की माझी प्रत्येक नवीन भूमिका माझ्या आधीच्या पात्रांपेक्षा वेगळी दिसावी. त्या व्यक्तिरेखेचा लूक वेगळा असावा, तिची देहबोली वेगळी असावी आणि प्रेक्षकांना माझ्यातील एक नवीन बाजू पाहायला मिळावी, यासाठी मी प्रयत्न करत असतो. वेदांतच्या भूमिकेसाठी मी स्वतःला फिजिकली ट्रान्सफॉर्म केलं आहे. त्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. रोज जिमला जाणं, खाण्यापिण्याचं पथ्य पाळणं आणि स्वतःच्या फिटनेसवर लक्ष देणं, हे सगळं मी करत आहे.

त्याचा परिणाम तुम्ही प्रोमोमध्ये पाहिला असेलच आणि मालिकेतही तो नक्कीच जाणवेल. मला प्रेक्षकांकडूनही या लूकला आणि प्रोमोला छान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माझी मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोहोचतेय याचा खूप आनंद आहे. मला स्वतःला नेहमीच नवीन आव्हानं स्वीकारायला आवडतात आणि वेदांतच्या भूमिकेच्या निमित्ताने मी स्वतःलाच पुन्हा एकदा आव्हान देत आहे. मालिका हा एक मोठा प्रवास असतो. या प्रवासात चांगले सहकलाकार आणि उत्तम टीम सोबत असेल, तर हा प्रवास आणखी सुंदर आणि सुखकर होतो. ‘धाकट्या सुनबाई’च्या निमित्ताने मला खूप उत्तम कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळत आहे आणि त्यासाठी मी खूप आनंदी आहे.

फ्लायदुबईच्या कॉकपिटमध्ये हल्ल्याचा आरोप, हमाम अलहमामी कोण? उड्डाणबंदीपासून कॉकपिटपर्यंतचा प्रवास

सगळेच कलाकार खूप सपोर्टिव्ह आहेत. आमच्यामध्ये सुरुवातीपासूनच छान केमिस्ट्री जुळून आली आहे आणि ती तुम्हाला मालिकेतही पाहायला मिळेल. आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे सर अतिशय छान पद्धतीने आमच्याकडून काम करून घेत आहेत. विशेषतः राधिका आणि वेदांतची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आम्हाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यांचं प्रेम खूप प्रोत्साहन देणारं आहे. त्यामुळे ही केमिस्ट्री आणि हा प्रवास प्रेक्षकांनाही आवडतोय याचा आनंद आहे. शूटिंगच्या निमित्ताने आमचं खूप फिरणं होत असतं. ‘धाकटी सुनबाई’च्या शूटिंगसाठी आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. मालिकेचे सुरुवातीचे काही भाग आम्ही कोल्हापूरमध्ये शूट केले आहेत.

पहिल्याच दिवशी मी अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि तिचे आशीर्वाद घेऊन शूटिंगला सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापूरमधील वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शूट केलं. पंचगंगा नदीच्या गंगा घाटावरही आम्ही बरेच सीन शूट केले आहेत, जे प्रेक्षकांना मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांमध्ये पाहायला मिळतील. वेदांत आणि राधिकाची पहिली भेटही याच नदीच्या काठावर होते. तिथे शूटिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक लोकांना समजली आणि आम्हाला भेटण्यासाठी तिथे प्रचंड गर्दी झाली होती. त्यांना भेटून आम्हालाही खूप छान वाटलं. प्रेक्षक आपल्याला नेहमी टीव्हीवर पाहतात; पण अशा निमित्ताने त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटता येते, संवाद साधता येतो, हे खूप खास असतं.

पावसामुळे भारत-पाकिस्तान फायनल रद्द झाली तर कोणाला मिळणार गोल्ड? जाणून घ्या काय आहेत नियम

आमच्यासाठी तो एक कमाल अनुभव होता. एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे. माझ्या आयुष्यातील पहिल्या मालिकेची सुरुवात झी टीव्हीच्या ‘अल्लादिन’ या मालिकेपासून झाली होती, ज्यामध्ये मी अल्लादिनची भूमिका साकारली होती. आणि आता पुन्हा एकदा झी कुटुंबाशी जोडला गेलो आहे. मला माझ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत. माझ्या आजवरच्या कामाला प्रेक्षकांनी नेहमीच छान प्रतिसाद दिला आहे आणि त्यांच्या या प्रेमामुळेच मला नवनवीन भूमिका करण्याची प्रेरणा मिळते. यापुढेही माझ्या कामावर आणि माझ्यावर अशीच साथ, प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू दे, हीच इच्छा आहे. ‘धाकट्या सुनबाई’ या नव्या मालिकेलाही तुमचं तितकंच प्रेम आणि आशीर्वाद मिळावा.

तेव्हा पाहायला विसरू नका ‘धाकट्या सुनबाई’, संध्या. 6:30 वा., फक्त आपल्या झी मराठीवर.

Exit mobile version