62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा ९ सप्टेंबरला, विशेष योगदान पुरस्कारांचे होणार वितरण

62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा 9 सप्टेंबरला 6 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

Untitled Design   2026 09 06T153746.781

Untitled Design 2026 09 06T153746.781

State Marathi Film Awards Ceremony : महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा 62 वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा बुधवार, दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या आयोजनाने होणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासोबतच चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारांचेही वितरण करण्यात येणार आहे.

या सोहळ्यात चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थितीत तर महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विशेष उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे.

दिल्लीत मोठी दुर्घटना! तीन मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली लोक अडकल्याची शक्यता

महाराष्ट्राच्या चित्रपटसृष्टीतील कलावंत, तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेली 61 वर्षांहून अधिक काळ सातत्याने मराठी चित्रपटकर्मींच्या कलात्मक योगदानाचा गौरव करणारा हा पुरस्कार सोहळा एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

“महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट आणि सांस्कृतिक परंपरेला आकार देणाऱ्या दिग्गजांच्या योगदानाचे स्मरण करत, नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणा देण्याचे काम या पुरस्कारांच्या माध्यमातून सातत्याने केले जाते. पुरस्कार सोहळा भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडावा, यासाठी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक तयारी करण्यात येत आहे.,” असे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version