Download App

Subhedar Trailer: पाहायला मिळणार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास; ‘सुभेदार’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Subhedar Trailer Out: प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चर्चा सध्या जोरदार रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या अष्टकातील पाचवे पुष्प चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नरवीर तानाजी मालुसरे (Tanaji Malusare) यांच्या कामगिरीवर आधारित ‘सुभेदार’ (Subhedar Trailer) हा पराक्रमी सुवर्ण इतिहासातील सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकंतच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक सिनेमानंतर आता लवकरच ‘सुभेदार’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरची सुरुवात आऊसाहेब कोंढाणा किल्ल्याबद्दल बोलत असताना दिसत आहे. त्यावर पुढच्या एका महिन्यामध्ये कोंढाणा तुमच्या चरणाशी आणून नाही ठेवला, तर नाव शिवबा नाही सांगणार, असे बोलत असलयाचे देखील पाहायला मिळत आहे.


यानंतर सुभेदार सिनेमात तानाजी सुभेदारांनी केलेली तलवारबाजी, छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी यांच्यातील मैत्री, कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी केलेली लढाई यांची झलक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे. तसेच या सिनेमात तानाजी सुभेदारांच्या घरी लेकाच्या लग्नाची सुरु असलेली लगबग, त्याचवेळी स्वराज्यावरील संकट आणि बेलभंडारा उचलून, हात उंचावून ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी शपथ घेऊन गड जिंकण्यासाठी निघालेले सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे हे बघायला मिळणार आहेत.

“म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्यात, पर त्या समद्यांसनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राजं हवं ना”, असा डोळ्यात अश्रू आणणारा एक डायलॉग देखील यामध्ये पाहायला मिळाला आहे. ‘सुभेदार’ या सिनेमात अजय पूरकर सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारल्याचे पाहायला मिळत आहे. तर त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर इत्यादी कलाकारांची मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे.

येत्या १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ हा सिनेमा संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार आहे. याअगोदर हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us