T.J. Gnanavel : होम्बळे फिल्म्सने आपल्या पुढील महत्त्वाकांक्षी चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. निर्माता विजय किरगंदूर यांच्या निर्मितीत साकारत असलेल्या या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता सूर्या, अभिनेत्री कायाडू लोहार आणि दिग्दर्शक टी. जे. ज्ञानवेल हे एकत्र येत असून, दमदार कथा आणि भव्य सिनेमॅटिक सादरीकरणाचा संगम घडवणारा हा चित्रपट ठरणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानाचे आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेले सूर्या गेली दोन दशकांहून अधिक काळ आपल्या दमदार आणि वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि सात फिल्मफेअर साउथ पुरस्कारांनी सन्मानित सूर्या यांनी व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांचीही वाहवा मिळवली आहे. अभिनेता म्हणूनच नव्हे, तर अर्थपूर्ण चित्रपटांची निर्मिती करणारे निर्माता म्हणूनही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन टी. जे. ज्ञानवेल करणार आहेत. त्यांच्या ‘जय भीम’ या चित्रपटाने प्रभावी कथा, भावनिक मांडणी आणि सामाजिक आशयामुळे देशभरात विशेष प्रशंसा मिळवली. विशेष म्हणजे ‘जय भीम’ हा IMDb इंडिया वरील सर्वाधिक रेटिंग मिळालेल्या चित्रपटांपैकी एक आहे. मानवी मूल्यांवर आधारित आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या कथा प्रभावीपणे पडद्यावर मांडण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ज्ञानवेल हे समकालीन भारतीय चित्रपटसृष्टीतील वैशिष्ट्यपूर्ण दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात.
गेल्या काही वर्षांत होम्बळे फिल्म्सने KGF, कांतारा आणि सलार सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देत भारतीय चित्रपटसृष्टीत नवे मापदंड निर्माण केले आहेत. दूरदृष्टी असलेल्या दिग्दर्शकांना साथ देत, भाषा आणि संस्कृतीच्या सीमा ओलांडणारे चित्रपट सादर करण्यासाठी ही निर्मिती संस्था प्रसिद्ध आहे. पॅन-इंडिया स्तरावर सिनेमाला नवी ओळख देणाऱ्या अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवणारे चित्रपट, भारतातील सर्वात मोठा अॅनिमेटेड चित्रपट महावतार नरसिंह प्रेक्षकांसमोर आणणे, तसेच भारतीय संस्कृतीशी नाळ जुळलेल्या कथा सादर करणे अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी सातत्याने नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.
याबाबत होम्बळे फिल्म्सचे संस्थापक विजय किरगंदूर म्हणाले, “होम्बळे फिल्म्समध्ये आम्ही नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की, उत्कटतेने काम करणारे लोक एका समान ध्येयासाठी एकत्र आले की प्रभावी सिनेमा जन्माला येतो. सूर्या आणि टी. जे. ज्ञानवेल यांच्यासोबतची ही भागीदारी म्हणजे प्रामाणिक, अर्थपूर्ण आणि जगभरातील प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी कथा सांगण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.” या चित्रपटासाठी अनुभवी तांत्रिक टीमचीही साथ लाभली आहे. संगीताची जबाबदारी साई अभ्यंकर यांच्याकडे असून, छायाचित्रण एस. आर. काथीर, प्रॉडक्शन डिझाइन के. काथीर आणि संकलन फिलोमिन राज करणार आहेत.
या चित्रपटाचा शुभारंभ 29 जून 2026 रोजी चेन्नई येथील पार्क हयातमध्ये भव्य मुहूर्त सोहळ्याने झाला. या कार्यक्रमाला चित्रपटातील कलाकार, तांत्रिक टीम आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सहकार्यांपैकी एकाची ही शुभ सुरुवात ठरली.
एक यशस्वी अभिनेता, उदयोन्मुख अभिनेत्री, दूरदृष्टी असलेले दिग्दर्शक आणि दर्जेदार सिनेमासाठी ओळखली जाणारी निर्मिती संस्था अशा चार ताकदवान घटकांचा हा संगम आहे. अर्थपूर्ण कथा सांगण्याच्या समान ध्येयाने एकत्र आलेली ही टीम सर्व पिढ्यांतील आणि जगभरातील प्रेक्षकांच्या मनात घर करणारा चित्रपट साकारण्यासाठी सज्ज झाली आहे.
