मनातील गुंतागुंत वाढविणारा ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित…

Drushya-Adrushya :  नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा एका ज्वलंत विषयाला वाचा

Drushya Adrushya 1

Drushya Adrushya 1

Drushya-Adrushya :  नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा एका ज्वलंत विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या डोळ्यांना दिसतं ते सत्य की आपल्याला होणारे भास खरे या अनाकलनीय कोड्याचे उत्तर शोधणारा ‘दृश्य-अदृश्य’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारे कथानक, आघाडीच्या कलाकारांचा सर्वोत्तम अभिनय आणि कुशल दिग्दर्शन असलेला ‘दृश्य-अदृश्य’ हा चित्रपट १९ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. ५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच ‘इफ्फी’मध्ये या चित्रपटाने जागतिक पातळीवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यात यश मिळविले. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आरएसटी कॅनव्हास निर्मित ‘दृश्य-अदृश्य’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी केली आहे. आजवर बऱ्याच आशयघन यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या मिलिंद लेले यांनी ‘दृश्य-अदृश्य’चे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शनासोबतच ‘दृश्य-अदृश्य’चे कथा-पटकथा लेखन मिलिंद लेले यांनीच केले असून, संवाद अस्मिता कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. ‘जे दिसतं तेच खरं असतं का?’ हा प्रश्न विचारत ‘दृश्य अदृश्य’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘२५ लाख रुपयांच्या इन्सेन्टिव्हचं सिक्रेट’ टिझरमधील रहस्य आणखी गडद करणारे असून, चित्रपटाबाबत कुतूहल जागविणारं आहे. ‘डोळ्यांवर विश्वास ठेवायचा की मनावर?’ हा प्रश्न उपस्थित करीत ‘दृश्य अदृश्य’चा टिझर मनातील गुंतागुंत आणखी वाढवतो. भास आणि सत्य यात खूप मोठं अंतर असल्याचे टिझर अधोरेखित करतो. ‘माणूस ओळखणं कठीण की सत्य?’ हा टिझरमध्ये विचारलेला प्रश्नही खोलवर विचार करायला लावतो. ‘दृश्य-अदृश्य’चा टिझर खऱ्या अर्थाने चित्रपटाबाबत उत्सुकता वाढविणारा असून, प्रदर्शनानंतर लगेचच सोशल मीडियावर टिझरला नेटकऱ्यांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे.

मुख्य भूमिकेतील अभिनेत्री पूजा सावंत या चित्रपटात आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा अतिशय वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. पूजाच्या जोडीला अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी, केया इंगळे आदी तगड्या कलाकारांची फळी आहे. गीतकार वलय मुळगुंद यांच्या गीतरचना संगीतकार आशिष मुजुमदार, देवदत्त बाजी यांनी गायिका प्रियांका बर्वे आणि निधी हेगडे यांच्या आवाजात संगीतबद्ध केल्या आहेत. नृत्य दिग्दर्शन दीपक देबनाथ यांनी केले असून, नितिन बोरकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे. अमोल साळुंके यांनी छायाचित्रण केले असून, सचिन वाघ यांनी संकलन केले आहे. महेश बराटे यांची रंगभूषा, तर किर्ती जंगम-जोशी यांची वेशभूषा आहे.

Exit mobile version