The divorce of Adinath Kothare and Urmila Kanetkar : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि चाहत्यांची आवडती जोडी असलेल्या आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी अखेर विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जवळपास 15 वर्षांचा वैवाहिक प्रवास संपवत दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेत असल्याची माहिती सोशल मीडियावरील संयुक्त पोस्टद्वारे दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. मात्र त्यावर आदिनाथ किंवा उर्मिला यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
आता दोघांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. संयुक्त निवेदनात आदिनाथ आणि उर्मिला यांनी म्हटले आहे की, खूप विचार केल्यानंतर आम्ही, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही स्पष्ट केले की, पती-पत्नी म्हणून त्यांचा प्रवास संपत असला तरी मुलगी जिजासाठी ते कायम एकत्र राहणार आहेत. आमची मुलगी जिजा ही आमचं सर्वस्व आहे. तिला प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा यासाठी आम्ही पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन करत राहू, असे त्यांनी नमूद केले.
या पोस्टमध्ये दोघांनी एकमेकांबद्दलचा आदरही व्यक्त केला आहे. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल कायम आदर राहील, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांनी आणि माध्यमांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, आयुष्याच्या या नव्या टप्प्यातही त्याच प्रेमाची अपेक्षा असल्याचे दोघांनी सांगितले. याचबरोबर त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. या विषयावर हेच आमचं एकमेव वक्तव्य असेल. यापुढे आम्ही कोणतीही चर्चा किंवा प्रतिक्रिया देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मी तीन दिवस झोपलो नाही, पण लोकांसाठी निर्णय घेतला, सचिन अहिर यांची भावनिक कबुली
दरम्यान, आदिनाथ आणि उर्मिलाच्या विभक्त होण्याच्या चर्चांना सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली होती. आदिनाथच्या गाजलेल्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी उर्मिला त्याच्या प्रमोशनल कार्यक्रमांमध्ये कुठेच दिसली नव्हती. तसेच तिने सोशल मीडियावर चित्रपटाबाबत कोणतीही पोस्ट केली नव्हती. त्याचप्रमाणे उर्मिलाच्या वाढदिवसानिमित्त आदिनाथकडूनही कोणतीही सार्वजनिक पोस्ट करण्यात आली नव्हती. याशिवाय उर्मिलाने इन्स्टाग्रामवर आदिनाथला अनफॉलो केल्याची चर्चा देखील रंगली होती. या सर्व घटनांमुळे दोघांच्या नात्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र त्यावेळी दोघांनीही मौन बाळगले होते.
डिसेंबर 2011 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या आदिनाथ आणि उर्मिला यांनी मराठी मनोरंजन विश्वात आदर्श जोडप्याची प्रतिमा निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील या लोकप्रिय जोडप्याचा वैवाहिक प्रवास आता संपला असला, तरी मुलगी जिजाच्या संगोपनासाठी दोघेही एकत्र राहणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली आहे.
