Download App

Jaaran Trailer : काळी जादू, अंधश्रद्धा आणि विवाहितेचा भूतकाळ 5 जूनला उलगडणार ?

Jaaran Trailer : ‘जारण’च्या थरारक टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असतानाच आता चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा भयावह माहोलमध्ये संपन्न झाला. यावेळी अनिल शर्मा, विकास बहल, राज मेहता हे बॅालिवूड दिग्दर्शकही या सोहळ्याला उपस्थित होते.

या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. विवाहित राधा वाड्यात पाऊल ठेवताच सुरू होणाऱ्या अनाकलनीय घटना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. राधाचे भांबावलेले डोळे, वाड्यात घडणाऱ्या रहस्यमय गोष्टी आणि अनिता दातेचा मंत्रोच्चार करताना दिसणारा अवतार हे सगळे दृश्य प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणणारे आहे.

ट्रेलरमधून हे स्पष्ट होते, की राधाचा या वाड्याशी धक्कादायक भूतकाळ जोडला आहे. त्यामुळे या वाड्याचे गूढ काय असेल? लहानपणी राधावर झालेल्या जारणाचा हा परिणाम आहे का? यामुळे तिला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल, हे पाहाणे नक्कीच थरारक ठरेल.

प्रस्तुतकर्ता अनिस बाझमी म्हणतात, ‘’ या चित्रपटाशी मी जोडलो गेलो, हे मी माझे भाग्य समजतो. अमृता सुभाषला मी आधीपासूनच ओळखतो. अतिशय हुशार अभिनेत्री आहे आणि तिच्यामुळेच मी या चित्रपटाचा भाग झालो, असे म्हटले तरी चालेल. जेव्हा मी हा चित्रपट बघितला. मी सुन्न झालो. अंगावर अक्षरशः काटा आला. कथा, दिग्दर्शन, अभिनय अप्रतिम. मराठीत पदार्पण करण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता चित्रपट असूच शकत नाही. कलाकारांनी आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेले आहे. भाषा जरी मराठी असली तरी हा पॅन इंडिया चित्रपट आहे.‘’

दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते म्हणतात, “ ‘जारण’ हा मानवी भावनांची आणि अंधश्रद्धेच्या परिणामांची खोल उकल करणारा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये जरी काही दृश्य गूढ आणि धक्कादायक वाटत असली, तरी या सगळ्याच्या पाठीमागे एक खोल भावनिक गुंतागुंत आहे. अनिता दाते आणि अमृता सुभाष यांचा जबरदस्त अभिनय प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करेल. हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरेल याची मला खात्री आहे.”

निर्माते अमोल भगत म्हणतात, “ या चित्रपटातून अंधश्रद्धा आणि मानसिकतेतून होणाऱ्या छळाचे वास्तव दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, आता ट्रेलर ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आपली कामगिरी चोख बजावली असल्याने चित्रपट उत्तम बनला आहे. हा थरारपट प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.”

अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए3 इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या 5 जून 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॅालिवूडला ‘भुलभुलैया 2’, ‘भुलभुलैया 3’, ‘वेलकम’ यांसारखे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी ‘जारण’च्या निमित्ताने प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.

वेस्ट इंडिजच्या मॅथ्यू फोर्डने रचला इतिहास, ODI मध्ये ठोकले सर्वात वेगवान अर्धशतक 

या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

follow us