नवी दिल्ली : प्रसिद्ध टॉलिवूड अभिनेते नंदामुरी तारकरत्न (39) यांचे शनिवारी निधन झाले. अलीकडेच तारकरत्न युवागलम पदयात्रेत सहभागी होत असताना गंभीर आजारी पडले होते. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना प्रथम कुप्पम रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना विशेष रुग्णवाहिकेतून बंगळुरू येथील नारायण हृदयालय रुग्णालयात चांगल्या उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
23 दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी रात्री तारकरत्न यांचे अकाली निधन झाल्याने तेलुगू चित्रपट विश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनावर अनेक चित्रपट आणि राजकीय व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे. सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या कुटुंबाप्रती तीव्र शोक व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहेत. ते आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सुपरस्टार अभिनेता एनटी रामाराव यांच्या कुटुंबातील सदस्य होते.
तारकरत्न यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर उद्योग आणि राजकारणात शोककळा पसरली आहे. चित्रपट उद्योगासोबतच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट करत अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. याशिवाय टीडीपीचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू, अभिनेते चिरंजीवी, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी आणि इतर नेत्यांनीही तारका रत्न यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं… आता निलंबनाचा प्रश्नच नाही ; Jayant Patil यांनी व्यक्त केली शंका
सिनेकरिअर
‘युवरत्न’, ‘भद्राद्री रामुडू’, ‘अमरावती’ आणि ‘नंदीस्वरडू’ या चित्रपटांनी तारकरत्नला चांगली ओळख मिळवून दिली. ‘अमरावती’ चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. अलीकडेच त्याने ‘9 तास’ या वेबसीरिजमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. राजकारणातही सक्रिय असलेले तारक रत्न अनेकदा तेलुगू देसम पार्टीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत. त्यांनी यापूर्वी पक्षाच्या वतीने प्रचारही केला होता.