‘तुंबाड’मधील अजरामर हस्तरच्या रूपात ओरीचा हॅलोविन अवतार; लोककथेला दिला ‘पॉप’ कल्चरचा अनोखा तडका

तुंबाडसारख्या लोककथांवर आधारित फँटसी विश्वाच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिक्वेल अधिक भव्य दृष्टिकोनातून कथा आणि दृश्यवैभव एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची अपेक्षा आहे.

Untitle (5)

Untitle (5)

Tumbad : ‘तुंबाड’ हा चित्रपट प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावर अनुभवलेला एक असामान्य लोककथांवर आधारित फँटसी चित्रपट आहे. गेल्या अनेक वर्षांत या चित्रपटाने चाहत्यांमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले असून, काळानुसार त्याची लोकप्रियता अधिकच वाढत गेली आहे. २०२४ मध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाच्या लोकप्रियतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. भारतीय चित्रपटांच्या पुनर्प्रदर्शनातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरत ‘तुंबाड’ने नवे विक्रम प्रस्थापित केले. आता ‘तुंबाड २’बद्दलची उत्सुकता वाढत असताना, या लोककथांवर आधारित फँटसी विश्वाच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिक्वेल अधिक भव्य दृष्टिकोनातून कथा आणि दृश्यवैभव एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची अपेक्षा आहे.

‘तुंबाड’चा प्रभाव नेहमीच चित्रपटगृहांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याने पॉप कल्चर आणि चाहत्यांच्या परंपरांमध्येही आपले स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या हॅलोविनच्या निमित्ताने या सांस्कृतिक प्रभावाने एक नवी उंची गाठली. इंटरनेटवरील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आणि सोशल मीडियावरील चर्चेचा विषय असलेल्या ओरीने ‘तुंबाड’मधील अजरामर आणि भयावह देवता हस्तरचा वेश धारण केला. आपल्या ट्रेंडसेटर अंदाजासाठी आणि अनपेक्षित लूक्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या ओरीच्या या हॅलोविन अवताराने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या या रूपामुळे ‘तुंबाड’चे गूढ आणि भयावह विश्व थेट पॉप कल्चरच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले.

हस्तरच्या संपूर्ण वेशभूषेत, त्याच्या व्यक्तिरेखेला अविस्मरणीय बनवणाऱ्या बारकाव्यांसह सजलेल्या ओरीच्या या लूकने इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चाहत्यांनीही या लूकवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक भयावह आणि वैशिष्ट्यपूर्ण खलनायकांपैकी एक असलेल्या हस्तरच्या रूपातून एका आधुनिक ट्रेंडसेटरने सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याबद्दल अनेकांनी आनंद व्यक्त केला. या लूकची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जाऊ लागली.

‘तुंबाड’च्या विश्वाविषयीची चाहत्यांची क्रेझ पुन्हा एकदा शिगेला पोहोचलेली असताना ओरीचा हा हटके हॅलोविन अवतार समोर आला आहे. अशा क्षणांमधून ‘तुंबाड’ आणि त्यातील अजरामर हस्तर ही व्यक्तिरेखा लोकांच्या दैनंदिन चर्चेचा आणि लोकप्रिय संस्कृतीचा किती महत्त्वाचा भाग बनली आहे, हे अधोरेखित होते. त्यामुळे ‘तुंबाड २’च्या प्रतीक्षेत असलेल्या चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Exit mobile version