ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांच्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धर्मेंद्र यांच्या जाण्याने बॉलिवुडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. फक्त सेनेसृष्टीच नव्हे तर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनीदेखील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली आहे.
कोण काय म्हणालं?
धर्मेंद्रजी यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. ते एक अभूतपूर्व अभिनेता होते, त्यांनी ज्या भूमिका केल्या, त्यामाध्यमातून त्यांनी लोकांच्या मनात घर केलं.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
दिग्गज अभिनेते धर्मेंद्रजी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे. भारतीय कला जगताचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. जवळजवळ सात दशकांपासून चित्रपटसृष्टीत त्यांचे अतुलनीय योगदान नेहमीच आदर आणि प्रेमाने लक्षात ठेवले जाईल.
राहुल गांधी, विरोधी पक्षनेते लोकसभा
‘१९६० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती. ‘शोले’मध्ये त्यांनी साकारलेला ‘वीरू’ आजही घनिष्ठ मैत्रीचं प्र
शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी
युवा नायक ते तडफदार-बलंदड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि पुढे बॉलिवुडचा हि-मॅन म्हणून लौकीक मिळवेलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. सहृदय आणि जुन्या-नव्या पिढीला जोडणारे, अनेकांसाठी आधार, मार्गदर्शक व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. या क्षेत्रातील ज्येष्ठत्व ते तितक्याच उमद्यापणाने मिरवत असत. मध्यंतरी त्यांनी लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार म्हणून बिकानेरचे प्रतिनिधीत्व केले होते. पण त्यांनी चित्रपटसृष्टी आणि अभिनय, या क्षेत्रातील प्रयोगशीलता यांनाच अधिक प्राधान्य दिले. सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. एकाच वर्षांत ९ हिट चित्रपट देण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते चित्रपट सृष्टीत सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाने आपल्या चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात ‘सुपरस्टार’ म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं, अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. तसेच, १९६० च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं.
राज ठाकरे, मनसे प्रमुख
धर्मेंद्र यांचा चित्रपट प्रवास म्हणजे मेहनत, समर्पण आणि कलाविश्वाप्रती असलेल्या निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून निखळ आनंद दिला. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या दीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीत आठ वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ मिळवले होते. त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे त्यांना ‘हिंदी सिनेमा’चा ‘ही-मॅन’ म्हणून ओळख मिळाली होती. त्यांच्या जाण्याने हिंदी चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटूंबियांना, चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.
अजित पवार, उपमुख्यमंत्री
