हिंदी चित्रपटसृष्टीत आईच्या भूमिका अजरामर करणाऱ्या वात्सल्यमूर्ती अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांना दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी हळहळी आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीत सुलोचना दीदी या सोज्वळ, प्रेमळ आई म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांनी हिंदी चित्रपटात साकारलेल्या आईच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. हिंदीसह मराठी चित्रपटातही त्यांनी काम केलय. आत्तापर्यंत सुलोचना दीदींनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
सुलोचना लाटकर यांच्या जन्म 30 जुलै 1928 मध्ये बेळगाव येथे झाला. 1943 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदापर्ण केलं. अभिनय क्षेत्रात त्यांना भालजी पेंढारकर यांचं मार्गदर्शन लाभलं होतं. त्यांचं दिसणं, हास्य आणि सहजसुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांना आपलसं केलं होतं.
LetsUpp Poll : होय, शिवसेनेबरोबरील युतीचा निर्णय चुकलाच, पण भाजपकडे बोटही दाखविले!
‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’, ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे त्यांचे मराठीतील लक्षवेधी चित्रपट. यासह अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रीची भूमिका साकारली. तर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आघाडीच्या अभिनेत्यांची आई साकारली. आईच्या भूमिकांमधून आपला अभिनयाचा ठसा उमटवला. हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन यांची आई अशी त्यांची ओळख होती. अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिकेतील त्यांचं काम लक्षवेधी ठरलं. ‘रेशमा और शेरा’, ‘मजबूर’, ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेली अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिका गाजल्या होत्या. 1966 मध्ये त्यांनी ‘आए दिन बहार के’, ‘गुलामी’ या चित्रपटात धम्रेंद यांच्या आईची भूमिका साकारली होती. शिवाय दिलीप कुमार यांच्या आईची भूमिकाही त्यांनी साकारली होती. देव आनंद, सुनील दत्त आणि इतर बऱ्याच कलाकारांसोबत त्यांनी काम केलं होतं.
सुलोचना दीदींना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2004 मध्ये फिल्मफेयर लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. 2009 मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सुलोचना दीदींच्या निधनाने हिंदीसह मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता प्रभादेवी येथील राहत्या घरी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल. तर दादर येथील शिवाजी पार्क येथे 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सुलोचन दीदी आपल्यात नसल्या तरी त्यांची कारकीर्द, त्यांचं काम, त्यांच्या भूमिका सदैव प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील.