Download App

कलाकारांच्याही पसंतीस उतरला ‘वाळवी’, आयएमडीबीवरही उत्कृष्ट रेटिंग

मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीय. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट आता सिनेसृष्टीतील कलाकारांच्याही पसंतीस पडलाय.

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनीही वाळवी या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यांनी सोशल मिडीयावर याविषयी पोस्ट केलीय. रवी जाधव या पोस्टमध्ये लिहीतात की, ‘आज रविवार, आज आपण एक उत्कृष्ट मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन आपल्या सुट्टीचा आनंद द्विगुणीत करु शकता. ‘वाळवी’ या चित्रपटाचे कौतुक आपण अनेक मान्यवरांकडून ऐकले असेलच त्यामुळे त्यावर अधिक काही न बोलता बोलून मी एवढच सांगेन की, हा चित्रपट लवकरात लवकर म्हणजे आजच्या आजच थिएटर मध्ये जाऊन पहा आणि इन्जॉय करा. परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी, स्वप्निल जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते, सुबोध भावे सर्वच अप्रतिम. झी स्टुडिओच्या मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील आणि संपुर्ण टिमला हा चित्रपट सादर केल्याबद्दल प्रचंड प्रेम. मराठी चित्रपटांच्या नावाने चांगभलं.’

एका कार्यक्रमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलय. ते म्हणाले की, ‘मी स्वत: हा चित्रपट पाहिला आहे. मराठी चित्रपटांमध्ये वेगळं काही घडत नाही. असं म्हणणाऱ्यांसाठी हा चांगला चित्रपट दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी आणलाय. वाळवी चित्रपट आवर्जून पाहा. हा चित्रप आवडला तर शंभर जणांना सांगा.’

सोशल मिडीयावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. सोशल मिडीयावर प्रेक्षक या चित्रपटाच्या हटके कथेचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसत आहेत. तर सिनेसमीक्षकांनीही या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीय. या चित्रपटातून रहस्यमयी मेजवानी अनुभवायला मिळत असल्याचही बोललं जातय. बॉक्स ऑफिसवर तर हा चित्रपट धुमाकूळ घालतोय शिवाय आयएमडीबीवर देखील या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळाला आहे.

या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरने हटके कथा आणि सादरीकरणामुळे उत्कंठा निर्माण केली होती. ‘वाळवी’ या चित्रपटाला आयएमडीबीवर 9.3 इतके रेटिंग मिळाले आहे. याच रेटिंगमुळे प्रेक्षकांना हा चित्रपट किती आवडला आहे, याची कल्पना येते. या चित्रपटातून एक हटके विषय मांडण्यात आला आहे. अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकाला खुर्चीला खिळवून ठेवतो. पुढे काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकाला लागून राहते. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळतेय.

Tags

follow us