नेपाळमध्ये महापुराचा कहर; आतापर्यंत 359 जणांचा मृत्यू, 288 भारतीय नागरिक बेपत्ता

Nepal Floods: पूरग्रस्त नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या 21 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी ही माहिती दिलीय.

Nepal Flood

Nepal Flood

Nepal Floods: नेपाळ आणि तिबेटमधील हिमस्खलनामुळे (Nepal Floods landslide) आलेल्या भीषण अचानक पुरात आतापर्यंत 359 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 1,500 हून नागरिक बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये 288 भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. हिमालयातील एका नदीजवळ संभाव्य हिमस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडला आणि त्यानंतर आलेल्या प्रचंड पुराच्या लोंढ्याने नेपाळ तसेच तिबेटमधील काही भागात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पूरग्रस्त नेपाळमध्ये बेपत्ता झालेल्या 21 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी ही माहिती दिलीय. हे सर्व २१ जण तामिळनाडूतील असून, त्यांना भारतात परत आणले जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “काही भारतीय अजूनही तिबेटमधील चीनच्या बाजूला अडकले आहेत. 200 हून अधिक भारतीयांनी मदतीसाठी संपर्क साधला आहे. त्यापैकी 95 जण सध्या डारचेन येथे आहेत. जैस्वाल यांनी सांगितले की, बेपत्ता असलेल्या 288 भारतीयांमध्ये नेपाळमधील पुराचा मोठा फटका बसलेल्या त्रिशूली परिसरातील वीज प्रकल्पात काम करणाऱ्या 73 जणांचाही समावेश आहे.


22,000 कोटी रुपयांचे कर्ज अन् 6.5 कोटी रुपयांची परतफेड ; सुभाष चंद्रा पुन्हा चर्चेत

सुमारे 200 सुरक्षित भारतीय नागरिकांनी स्थलांतरासाठी मदत मागितली आहे. यामध्ये तिबेटमधील डारचेन या छोट्या गावातील सुमारे 95 जणांचा समावेश आहे. हे नागरिक नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी हिल्सा दिशेने पुढे जात आहेत. याशिवाय जिलॉन्ग शहरात 4, सागाच्या दिशेने जाणाऱ्या झुतुलफुक येथे 30 आणि इतर ठिकाणी जाणारे सुमारे 60 ते 70 भारतीय नागरिक आहेत.

नेपाळ आणि तिबेटमध्ये पुराचा तांडव
संभाव्य हिमस्खलनामुळे भोते कोशी नदीच्या उपनदीचा प्रवाह अडला आहे. त्यानंतर बुधवारी नेपाळमधील रसुवा, धादिंग आणि नुवाकोट या तीन जिल्ह्यांना अचानक आलेल्या पुराचा मोठा फटका बसला. पूराचा पहिला तडाखा तिबेटच्या सीमेजवळील रसुवागढी परिसरातील तिमुरे येथे बसला. त्यानंतर पुराचे पाणी नदीच्या प्रवाहासोबत खालील भागात वेगाने पसरले. तिबेटमधील नेपाळच्या सीमेवरील ग्यिरोंग बंदर हे सुरुवातीच्या काळात पुराच्या तडाख्यात आलेल्या प्रमुख ठिकाणांपैकी एक होते. त्यानंतर पुराच्या पाण्याने अनेक वस्त्यांमध्ये शिरकाव करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. अचानक आलेल्या पुरामुळे अनेक वसाहती वाहून गेल्या आहेत. रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे.नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खानाल यांनी सांगितले की, आपत्तीची व्याप्ती निश्चित करण्याचे काम अद्याप सुरू आहे. नेपाळ आणि तिबेटमध्ये जवळपास 1,500 लोक बेपत्ता आहेत. त्यामध्ये किमान आठशे परदेशी नागरिकांचा समावेश आहे.


Sugar Rate Today : दिलासा, साखर 52 रुपये प्रतिकिलो तर गुळाच्या दरात तब्बल 1600 रुपयांची घसरण

मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता
नेपाळ पोलिसांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बचाव पथकांनी पुन्हा शोधमोहीम सुरू केली असून, आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता आहे. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते अभि नारायण काफ्ले यांनी रॉयटर्सला सांगितले की, “शोधमोहीम पुन्हा सुरू केली आहे. आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.


भारताकडून मदत

चीनच्या सरकारी प्रसारमाध्यम CCTV नुसार, तिबेटमधील ग्यिरोंग काउंटीमध्ये 558 जण बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 260 जण परदेशी नागरिक आहेत. या भीषण आपत्तीनंतर भारताने नेपाळला मानवतावादी मदत देण्यास सुरुवात केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी सांगितले की, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण साहित्य, औषधे तसेच अन्नपॅकेट्स घेऊन दुसरे विमान नेपाळसाठी रवाना झाले आहे. या विमानातून 37.5 टन मदत सामग्री पाठवण्यात आली आहे. यापूर्वी बुधवारी रात्री भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानातून 10 टन आपत्कालीन साहित्य नेपाळला पाठवण्यात आले होते. यामध्ये तात्पुरते निवारे, ब्लँकेट्स, स्वच्छता किट्स, सौर दिवे आणि आवश्यक औषधांचा समावेश होता.

Exit mobile version