America Iran War : इराणचे 5 तेल टँकर्स नष्ट; अमेरिकन लष्कराची मोठी कारवाई

America Iran War : अमेरिका आणि इराण दरम्यान तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ला करण्यात आला होता

America Iran War

America Iran War

America Iran War : अमेरिका आणि इराण दरम्यान तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडून इराणवर जोरदार हल्ला करण्यात आला होता. तर आता पुन्हा एकदा अमेरिकन लष्कराने मोठी कारवाई करत इराणच्या पाच तेल टँकर्सना टार्गेट केले आहे. याबाबत अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’ने (CENTCOM) माहिती दिली आहे. ही कारवाई इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचा दावा देखील सेंट्रल कमांडकडून करण्यात आला आहे.

अमेरिकन सेंट्रल कमांडने मंगळवारी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. तसेच कारवाईचा व्हिडिओ देखील त्यांच्याकडून व्हायरल करण्यात आला आहे. सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने अमेरिकन युद्धनौकेवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणचे पाच कच्चे तेल वाहून नेणारे टँकर्स नष्ट केले. गेल्या दोन दिवसांत इराणने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे युद्धनौकेला टार्गेट करण्याचे जे दोन प्रयत्न केले, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही कारवाई केली. तर दुसरीकडे इराणच्या सरकारीवृत्तानुसार, अमेरिकन लष्कराने पर्शियन आखातातील ‘जास्क’ (Jask) हे दक्षिण बंदर आणि ‘खार्ग बेट’ (Kharg Island) यांच्या जवळ इराणच्या किमान तीन तेल टँकर्सवर हल्ले केले. तसेच, टँकर्सवरील कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचेही त्यात नमूद करण्यात आले.

इराणचा इशारा

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या नौदलाने कुवेत आणि बहरीन बंदरांजवळ असलेल्या तेल टँकर्सवरील कर्मचाऱ्यांना आपली जहाजे सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. इराणचा आरोप आहे की, या देशांमध्ये अमेरिकन लष्कराची उपस्थिती आहे आणि ते अमेरिकेच्या कारवायांना सहकार्य करत आहेत. यामुळे आखाती प्रदेशातील सागरी सुरक्षेबाबतची चिंता अधिकच वाढली आहे.

इराण-अमेरिका तणावाचा जागतिक तेल बाजारावर परिणाम

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा परिणाम जागतिक तेल बाजारावरही दिसून येत आहे. आखाती प्रदेशात तेल टँकर्सना लक्ष्य केले जात असताना, कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलर्सच्या दिशेने झपाट्याने वाढल्या आहेत. जागतिक स्तरावर तेलाच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे मार्ग असलेल्या या प्रदेशात जर तणाव कायम राहिला, तर त्याचा जागतिक तेल पुरवठा आणि किमतींवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Exit mobile version