मुंबई : बँकांच्या अनेक संघटना धोरणांविरोधात पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. बँक कर्मचारी संघटनांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने गुरुवारी त्यांची भूमिका स्पष्ट केली. विविध मागण्यांसाठी संघटनांनी 30 जानेवारी रोजी दोन दिवसांची संपाची हाक दिली आहे.
अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाचे अधिकारी म्हणाले, 30 आणि 31 जानेवारी बँकांचा संप झाल्यास बँका सलग चार दिवस बंद राहतील. ग्राहकांच्या सेवांवर त्याचा थेट परिणाम होईल. 28 जानेवारी रोजी चौथा शनिवार तर 29 जानेवारी रोजी रविवार असेल.
नेमक्या काय आहेत मागण्या? जाणून घ्या
बँकेत 5 दिवसांचा कामाचा आठवडा असावा, पेन्शन अपडेट करावी. एनपीएस समाप्त करावी. वेतन सुधारणा करावी. सर्वच विभागात तात्काळ भरती करण्यात यावी, अशा मागण्या बँक संघटनेने केल्या आहेत. त्यासाठीच त्यांनी हा बंद पुकारला आहे.
30 आणि 31 जानेवारी रोजी सोमवार आणि मंगळवार येत आहेत. तर त्यापूर्वी 28 जानेवारी रोजी चौथा शनिवार तर 29 जानेवारी रोजी रविवार असल्याने बँका चार दिवस बंद राहतील. ऐन अर्थसंकल्पाच्या तोंडावरच हे आंदोलन होत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य ठेवीदारांना बसेल.
यापूर्वीही बँक संघटनांनी संपाची हाक दिली होती. संपामुळे ATM सेवाही प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकेशी संबंधित काही कामकाज करायचे असेल तर या दिवशीपूर्वीच ते उरकून घ्या. त्यामुळे कामात अडथळा येणार नाहीत.