नवी दिल्ली : तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. मध्य तुर्की भागात शनिवारी 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) नुसार भूकंप 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होता. मात्र, भूकंपानंतर जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 45 हजारांहुन अधिकचा मृत्यू झाला होता. बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढत आहे. भूकंपामुळे तुर्कीमधील सुमारे 2,64,000 अपार्टमेंट उद्ध्वस्त झाले आहेत. यामध्ये राहणाऱ्या लाखो लोकांपैकी बरेच लोक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत किंवा बेपत्ता आहेत.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये दोन दशलक्षाहून अधिक बेघर लोक तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये राहत आहेत. तुर्कस्तानच्या भूकंपग्रस्त भागात बचावकार्य सुरू झाले असून आता मदत साहित्य पोहोचू लागले आहे, मात्र सीरियातील परिस्थिती भयावह आहे. भूकंपामुळे तिथल्या उत्तर-पश्चिम भागात प्रचंड विध्वंस झाला आहे. हा भाग बंडखोरांच्या ताब्यात आहे आणि ते प्रभावित भागात मदत पुरवठा पोहोचू देत नाहीत.
बेपत्ता फुटबॉलपटूचा मृतदेह सापडला
भूकंपाच्या वेळी कोसळलेल्या इमारतीच्या अवशेषांमध्ये शोध पथकांनी घानाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ख्रिश्चन अत्सूचा मृतदेह शोधला आहे. 31 वर्षीय सॉकर स्टारचे अवशेष, जो तुर्की सुपर लिग क्लब हतायस्पोरसाठी खेळत होता, त्याच शहरातील अंताक्यातील 12 मजली इमारती खाली सापडले.