एलन मस्क यांचा मोठा इशारा! 2028 मध्ये डेमोक्रॅट्स जिंकले तर अमेरिकेचं लोकशाही भविष्य धोक्यात?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना एलन मस्क यांनी अमेरिकेचा खेळ संपेल अशा शब्दांत चिंता व्यक्त केली.

Untitled Design   2026 10 31T122637.894

Untitled Design 2026 10 31T122637.894

Elon Musk’s major warning to America : अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलं आहे. 2028 च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधीगृह, सिनेट आणि राष्ट्राध्यक्षपद या तिन्ही ठिकाणी विजय मिळवला, तर अमेरिकेचे राजकीय भवितव्यच बदलू शकतं, असा इशारा मस्क यांनी दिला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना त्यांनी अमेरिकेचा खेळ संपेल अशा शब्दांत चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, ही परिस्थिती अमेरिकेतील लोकशाहीसाठी मोठा धोका ठरू शकते.

एलन मस्क यांनी गुरुवारी एक्सवर पोस्ट करत डेमोक्रॅटिक पक्षाच्या संभाव्य विजयाबाबत चिंता व्यक्त केली. 2028 मध्ये डेमोक्रॅट्सनी प्रतिनिधीगृह, सिनेट आणि राष्ट्राध्यक्षपदावर एकाच वेळी विजय मिळवल्यास ते तीन पावलं उचलू शकतात, असा दावा त्यांनी केला. मस्क यांच्या मते, पहिलं पाऊल म्हणजे वॉशिंग्टन डीसी आणि प्यूट्रो रिको यांना अमेरिकेच्या राज्याचा दर्जा देणे. त्यामुळे सिनेटमध्ये डेमोक्रॅट्सची ताकद वाढू शकते. दुसरं म्हणजे, अमेरिकेच्या सीमा खुल्या करून देशात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या स्थलांतरितांना कायदेशीर दर्जा दिला जाऊ शकतो. त्यामुळे भविष्यात डेमोक्रॅट्सना कायमस्वरूपी राजकीय बहुमत मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल, असा त्यांचा दावा आहे.

तिसरं म्हणजे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवून डेमोक्रॅट्स स्वतःच्या बाजूने बहुमत निर्माण करू शकतात, अशी शक्यता देखील मस्क यांनी व्यक्त केली. या तिन्ही निर्णयांमुळे अमेरिकेची सध्याची राजकीय व्यवस्था पूर्णपणे बदलू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. डेमोक्रॅट्सनी हे निर्णय घेतल्यास अमेरिका कायमस्वरूपी एकाच पक्षाच्या नियंत्रणाखाली जाईल आणि लोकशाहीचा मूळ अर्थच संपुष्ठात येईल, असा दावा मस्क यांनी केला आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या समर्थकांनी आगामी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. ही परिस्थिती रोखण्यासाठी 2029 मध्ये सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे किमान ५१ सदस्य असणे आवश्यक असल्याचे देखील मस्क यांनी म्हटले आहे.

वर्षभर मुंबई पोलिसांना जमलं नाही, तुकाराम मुंढेंनी आठवड्यात करून दाखवलं, कॅन्टीनला 75 हजारांचा दंड!

एलन मस्क यांची ही वक्तव्ये अशा वेळी समोर आली आहेत, जेव्हा अमेरिकेच्या राजकीय इतिहासात सर्वाधिक वैयक्तिक राजकीय देणगी देणारी व्यक्ती म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे. 3 नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुकीपूर्वी मस्क यांनी रिपब्लिकन उमेदवार आणि राजकीय संघटनांसाठी 442 दशलक्ष डॉलरहून अधिक खर्च केल्याचे वृत्त आहे. द हिलच्या वृत्तानुसार, अलीकडेच समोर आलेल्या निवडणूक निधीविषयक कागदपत्रांमध्ये मस्क यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या अमेरिका पॅक या संघटनेला आणखी 76.8 दशलक्ष डॉलर दिल्याचे समोर आले आहे. यापूर्वी त्यांनी रिपब्लिकन उमेदवार आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांच्या समर्थनासाठी 366 दशलक्ष डॉलर खर्च केले होते.

2024 च्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान एलन मस्क यांनी अमेरिका पॅक या राजकीय संघटनेची स्थापन केली होती. डोनाल्ड ट्रम्प आणि इतर रिपब्लिकन उमेदवारांच्या प्रचारासाठी मस्क यांनी 250 दशलक्ष डॉलरपेक्षा अधिक खर्च केला होता. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, काँग्रेसमध्ये रिपब्लिकन पक्षाचे नियंत्रण कायम राहावे, यासाठी मस्क यांनी आपल्या राजकीय देणग्यांचा मोठा हिस्सा खर्च केला आहे.

दरम्यान, 25 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या सीबीएस न्यूजच्या सर्वेक्षणात प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला आघाडी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, डेमोक्रॅट्सना 229 जागा मिळू शकतात. काही अंदाजांनुसार हा आकडा 230 च्या पुढेही जाण्याची शक्यता आहे. मात्र, रिपब्लिकन पक्षाकडेही प्रतिनिधीगृहातील बहुमत कायम राखण्याची मर्यादित संधी आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून डेमोक्रॅट्सची आघाडी कायम असली, तरी त्यात मोठी वाढ झालेली नाही. महागाई आणि अर्थव्यवस्थेची स्थिती हे मुद्दे मतदारांच्या निर्णयावर प्रभाव टाकत आहेत. विशेष म्हणजे, कोणत्याही पक्षाकडे सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस योजना असल्याचा विश्वास अनेक मतदारांना नाही.

Navnath Ban On Nilesh Rane : #लायकी अन् नारायण राणेंसोबतचा फोटो; निलेश राणेंना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 27 ऑक्टोबर रोजी मध्यावधी निवडणुकांच्या निकालाबाबत महत्त्वाचे विधान केले होते. निवडणूक निष्पक्ष आणि प्रामाणिक पद्धतीने झाली, तर आपण निकालाचा आदर करू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मतचोरी पकडून दिल्यास 10 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 9.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे. त्याचवेळी गरज पडल्यास राष्ट्राध्यक्ष म्हणून व्हेटो अधिकाराचा वापर करण्याचे संकेतही त्यांनी दिले.

पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, परिस्थितीनुसार मार्ग काढला जाईल. माझ्याकडे व्हेटोचा मजबूत अधिकार आहे. त्याचा वापर करण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र, निवडणूक प्रामाणिकपणे झाली तरच मी तिचा निकाल स्वीकारेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मध्यावधी निवडणुकीपूर्वी ट्रम्प प्रशासनासमोर आर्थिक आव्हाने आणि घटती लोकप्रियता हे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणानुसार, ट्रम्प यांची अप्रूव्हल रेटिंग घसरून 37 टक्क्यांवर आली होती.

1990 मध्ये अशा प्रकारची सर्वेक्षणे सुरू झाल्यापासून मध्यावधी निवडणुकीपूर्वी एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची ही सर्वात कमी लोकप्रियता असल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. त्यामुळे 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुका ट्रम्प प्रशासनासाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहेत. या निवडणुकीत प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहांवर कोणाचे नियंत्रण राहणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात आगामी काळात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version