Video : सूर्यावरचं मोठं रहस्य अखेर कॅमेऱ्यात; पृथ्वीवर याचा नेमका काय परिणाम होणार?

Sun New High Resolution Photos सूर्याच्या पृष्ठभागावर समुद्रातील महाकाय भोवऱ्यांसारखे भंवर तयार होत असतील तर?

Scientists captured high resolution video of the surface of sun

Scientists captured high resolution video of the surface of sun

New Images Reveal The Sun Like Never Before Ahead Of Total Solar Eclipse :  कल्पना करा… सूर्याच्या पृष्ठभागावर समुद्रातील महाकाय भोवऱ्यांसारखे भंवर तयार होत असतील तर? आतापर्यंत ही केवळ शास्त्रज्ञांची कल्पना होती. मात्र, जगातील सर्वात शक्तिशाली सौर दुर्बिणीने प्रथमच सूर्यावरील हे रहस्यमय भंवरचे (Whirlpools/Vortices) हाय-रिझोल्यूशन फोटो आणि व्हिडिओ टिपले आहेत. या शोधामुळे सूर्यावरील प्रचंड ऊर्जा विस्फोट, ‘स्पेस वेदर’ आणि त्याचा पृथ्वीवरील परिणाम यामागील अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाई बेटावरील उंच पर्वतावर बसवण्यात आलेल्या इनोए सोलर टेलिस्कोपच्या साहाय्याने हे निरीक्षण करण्यात आले. या दुर्बिणीतून सूर्याच्या पृष्ठभागावरील (फोटोस्फिअर) अत्यंत सूक्ष्म हालचाली प्रथमच इतक्या स्पष्टपणे टिपण्यात आल्या आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष प्रतिष्ठित ‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.

सूर्यावर नेमकं काय दिसलं?

शास्त्रज्ञांना सूर्याच्या पृष्ठभागावर सतत फिरणारे विशाल भंवर (Vortices) दिसून आले. सूर्याच्या अतितप्त वायूंची हालचाल आणि त्याचे शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र यांच्या परस्परसंवादातून हे भंवर तयार होतात. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात चुंबकीय ऊर्जा साठते आणि पुढे ती सौर ज्वाला (Solar Flares) तसेच कोरोनल मास इजेक्शन (CME) सारख्या शक्तिशाली विस्फोटांना कारणीभूत ठरू शकते.

‘स्पेस वेदर’चा पृथ्वीवर काय परिणाम होतो?

सूर्यावरून होणाऱ्या ऊर्जा आणि प्लाझ्माच्या विस्फोटांमुळे ‘स्पेस वेदर’ तयार होते. याचा परिणाम पृथ्वीवरील अनेक महत्त्वाच्या यंत्रणांवर होऊ शकतो. यामुळे वीज वितरण प्रणाली (Power Grid) बिघडू शकते. संचार आणि नेव्हिगेशन उपग्रहांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. GPS सेवांवर परिणाम होऊ शकतो. तसेच  अंतराळवीरांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते, सूर्याच्या या सूक्ष्म हालचाली समजून घेतल्यास भविष्यात स्पेस वेदरचा अधिक अचूक अंदाज बांधणे शक्य होणार आहे.

‘केल्विन-हेल्महोल्ट्झ अस्थिरता’ म्हणजे काय?

या संशोधनात शास्त्रज्ञांनी सूर्यावरील ‘केल्विन-हेल्महोल्ट्झ अस्थिरता’ (Kelvin-Helmholtz Instability) या प्रक्रियेचीही स्पष्ट नोंद केली आहे. दोन वेगवेगळ्या वेगाने वाहणाऱ्या अतितप्त वायूंच्या थरांमध्ये घर्षण निर्माण झाल्यावर लहान-लहान भोवरे तयार होतात. हेच भोवरे पुढे मोठ्या ऊर्जा प्रक्रियांना चालना देतात. समुद्रातील छोट्या लाटा कालांतराने प्रचंड लाटांमध्ये रूपांतरित होण्यामागेही हाच भौतिकशास्त्रीय सिद्धांत कार्यरत असतो. शास्त्रज्ञांनी सूर्यावर जे शोधून काढले आहे त्याला केल्विन-हेल्महोल्ट्झ अस्थिरता म्हणतात.

शास्त्रज्ञ काय म्हणाले?

अमेरिकेच्या नॅशनल सोलर ऑब्झर्व्हेटरीचे संचालक डॉ. डेविड बोबोल्ट्झ यांनी सांगितले की, सूर्य हा संपूर्ण स्पेस वेदरचा मुख्य स्रोत आहे. त्याच्या पृष्ठभागावरील अत्यंत सूक्ष्म प्रक्रिया समजल्या तर अंतराळातील हवामानाचा अधिक अचूक अंदाज बांधणे शक्य होईल. तर खगोलशास्त्रज्ञ डॉ. डेविड कुरिद्झे यांच्या मते, सूर्यावरील हे फिरणारे भंवर चुंबकीय ऊर्जा तयार करतात आणि त्यातून पुढे मोठ्या सौर विस्फोटांना चालना मिळते.

मानवजातीसाठी का महत्त्वाचा आहे हा शोध?

शास्त्रज्ञांच्या मते, सूर्य ही मानवासाठी सर्वात जवळची नैसर्गिक प्रयोगशाळा आहे. सूर्यावरील अशा निरीक्षणांमुळे केवळ स्पेस वेदरच नव्हे, तर भौतिकशास्त्रातील अनेक मूलभूत नियम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होणार आहे. भविष्यात पृथ्वीवरील तांत्रिक यंत्रणा आणि उपग्रहांचे संरक्षण करण्यासाठीही हा शोध अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Exit mobile version