Identity of Flydubai co-pilot revealed : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात भारतीय कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर कथित हल्ला करून विमानाला धोकादायकरीत्या खाली नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहवैमानिकाची ओळख समोर आली आहे. त्याचं नाव हमाम अलहमामी असून तो ओमानी नागरिक असल्याचं वृत्त आहे. 30 सप्टेंबर रोजी फ्लायदुबईच्या FZ1073 विमानात कॉकपिटमध्ये हा प्रकार घडला. भारतीय कॅप्टन जखमी झाल्यानंतरही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि अखेर विमानाला सौदी अरेबियातील तबूक येथे सुरक्षितपणे वळवण्यात आलं. या प्रकरणाचा दहशतवादाच्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
दरम्यान, हमाम अलहमामीच्या पूर्वीच्या पार्श्वभूमीबाबतही धक्कादायक माहिती समोर येत आहे. वृत्तांनुसार, ओमानमध्ये काम करत असताना त्याच्याबाबत कथित कट्टरपंथी विचारसरणीशी संबंधित सुरक्षा चिंता निर्माण झाल्या होत्या. काही वृत्तांमध्ये तो ओमान एअरमध्ये प्रशिक्षणाच्या भूमिकेत असताना त्याच्यावर लक्ष ठेवण्यात आल्याचं आणि त्यानंतर त्याला उड्डाणाच्या जबाबदारीपासून दूर करण्यात आल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्याने फ्लायदुबईमध्ये काम सुरू केल्याचंही वृत्त आहे.
पावसामुळे भारत-पाकिस्तान फायनल रद्द झाली तर कोणाला मिळणार गोल्ड? जाणून घ्या काय आहेत नियम
यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे, ज्या व्यक्तीबाबत ओमानमध्येच कथित कट्टरपंथी विचारांमुळे उड्डाणाशी संबंधित निर्बंध लावण्यात आले होते, त्याला फ्लायदुबईमध्ये वैमानिक म्हणून नियुक्ती कशी मिळाली? तसेच, त्याची पार्श्वभूमी आणि पूर्वीच्या सुरक्षा नोंदींची भरती प्रक्रियेदरम्यान पुरेशी पडताळणी झाली होती का, याचाही तपास केला जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित विमान दुबईहून तेल अवीवला जात असल्याने या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आहे.
हमाम अलहमामीने फ्लायदुबईमध्ये सुमारे आठ महिने काम केल्याचं काही वृत्तांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्यापूर्वी त्याच्या ओमान एअरमधील नोकरीबाबतही माहिती समोर आली आहे. त्याच्या कथित सोशल मीडिया हालचाली, पूर्वीचा व्यावसायिक प्रवास आणि सुरक्षा नोंदी यांचा तपास सध्या संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे. मात्र, त्याच्या कथित विचारसरणीचा आणि विमानातील हल्ल्याच्या उद्देशाचा नेमका संबंध काय होता, हे तपासातून स्पष्ट होणं बाकी आहे.
दुष्काळाच्या सावटाखालील धरणांची पातळी खालावली, उजनी-जायकवाडीतून दररोज लाखो लिटर पाण्याचे बाष्पीभवन
या संपूर्ण प्रकरणामुळे विमान सुरक्षा आणि वैमानिकांच्या पार्श्वभूमीच्या तपासणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ओमानमध्ये सुरक्षा कारणांमुळे उड्डाणापासून दूर करण्यात आलेल्या व्यक्तीला दुसऱ्या देशातील विमान कंपनीने वैमानिक म्हणून नियुक्त करताना कोणत्या पातळीवर तपासणी केली होती, आणि त्याला तेल अवीवच्या विमानात कॉकपिटपर्यंत प्रवेश कसा मिळाला? या प्रश्नांची उत्तरं आता सुरू असलेल्या तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.
