युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचा मोठा निर्णय; ‘आक्रमणाचा हेतू नाही’ राष्ट्राध्यक्षांकडून शेजारी देशांची माफी

वाढत्या प्रादेशिक संघर्षाच्या वातावरणात इराणला इतर देशांवर आक्रमण करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले.

Untitled Design 147

Untitled Design 147

Iranian President apologizes to neighboring countries : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूूद पेझेश्कियन यांनी शेजारी देशांची माफी मागितली आहे. वाढत्या प्रादेशिक संघर्षाच्या वातावरणात इराणला इतर देशांवर आक्रमण करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेला तणाव अद्याप कायम आहे. शनिवारी देशाला संबोधित करताना पेझेश्कियन यांनी सांगितले की, इराणच्या तात्पुरत्या नेतृत्व परिषदेनं शेजारी देशांवर होणारे हल्ले तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या देशांकडून हल्ला झाल्याशिवाय क्षेपणास्त्र डागले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पेझेश्कियन म्हणाले, मी शेजारी देशांची माफी मागतो. आम्हाला इतर देशांवर आक्रमण करण्याचा कोणताही हेतू नाही. प्रदेशातील तणाव अधिक वाढू नये, यासाठी हा निर्णय घेतला आहे.

शेजारी देशांवरील हल्ले थांबवण्याचा निर्णय

इराणच्या नेतृत्व परिषदेनं शेजारी देशांवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतल्याचे पेझेश्कियन यांनी सांगितले. मात्र, जर त्या देशांकडून इराणवर हल्ला झाला, तर त्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तात्पुरत्या नेतृत्व परिषदेनं जाहीर केले आहे की, शेजारी देशांवर हल्ले होणार नाहीत आणि तेथून इराणवर हल्ला झाला नाही, तोपर्यंत क्षेपणास्त्रही डागले जाणार नाहीत, असे पेझेश्कियन यांनी सांगितले.

इस्रायलसोबत संघर्ष कायम

दरम्यान, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष मात्र सुरूच आहे. अमेरिकेने आणि इस्रायलने इराणच्या ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर हा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. शनिवारी सकाळी इस्रायलच्या दिशेने इराणी क्षेपणास्त्रे झेपावताना दिसली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने तेहरानमधील पायाभूत सुविधांवर नव्या हवाई हल्ल्यांची मालिका सुरू केली. इस्रायलने शेजारील लेबनॉनमध्येही हल्ले केले असून, तेथे इराण आणि हिझ्बुल्लाहशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे.

राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा; शरद पवार यांच्या मालमत्तेचा आकडा जाहीर

ट्रम्प यांची ‘बिनशर्त शरणागती’ची मागणी

या युद्धाचा दुसरा आठवडा सुरू झाला असून संघर्ष कधी थांबेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर दबाव वाढवत बिनशर्त शरणागतीची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, इराणसोबत कोणताही करार होणार नाही, फक्त बिनशर्त शरणागतीच स्वीकारली जाईल. त्यांनी पुढे असेही म्हटले की, इराणमध्ये नवे नेतृत्व आल्यावर अमेरिका आणि तिचे सहयोगी देश त्या देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी मदत करतील.

मात्र, ट्रम्प यांच्या या मागणीला पेझेश्कियन यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी, ही त्यांची अपेक्षा अवास्तव आहे. आमच्याकडून अशी शरणागती मिळेल, ही त्यांची स्वप्नेच आहेत, असे ते म्हणाले.

युद्धाचा विस्तार, मृतांचा आकडा वाढतो

हा संघर्ष आता इराणच्या सीमांच्या पलीकडेही पसरला आहे. अमेरिकेच्या लष्करी तळ असलेल्या काही गल्फ देशांवरही इराणने हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत अमीर सईद इरावानी यांच्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये किमान 1,332 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला असून हजारो जण जखमी झाले आहेत. त्याचवेळी इराणच्या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून किमान 6 अमेरिकन सैनिक ठार झाल्याचीही माहिती आहे.

लेबनॉनमध्ये मोठे विस्थापन

या संघर्षाचा परिणाम लेबनॉनवरही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. इस्रायलने बेरूतच्या दक्षिणेकडील भागांवर तीव्र हल्ले केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. नॉर्वेजियन रिफ्यूजी कौन्सिलच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत सुमारे 3 लाख लोक विस्थापित झाले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इस्रायली हल्ल्यांमध्ये 123 जणांचा मृत्यू झाला असून 683 जण जखमी झाले आहेत.

जागतिक बाजारपेठांवरही परिणाम

या वाढत्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठांवरही मोठा परिणाम झाला आहे. युरोप आणि अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली असून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. विशेषतः हॉर्मूज सामुद्रधुनीमधील जहाजवाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगातील जवळपास पंचमांश तेलपुरवठा या मार्गाने होतो, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.

Exit mobile version