Israel-lebanon war : इराण आणि अमेरिका युद्धाला पूर्णविराम मिळाल्यानंतरही इस्त्राइलकडून लेबनॉनवर (Israel-lebanon war) हल्ले सुरुच असल्याचं समोर आलंय . इस्त्राइलकडून लेबनॉनवर हवाई हल्ले केले असून जो पर्यंत लेबनॉनवरील हल्ले थांबत नाहीत, तोवर होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार असल्याचं इराणकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आता युद्धविराम मिळाल्यानंतर सुरु झालेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्यात आलीयं.
इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये बुधवारी रात्रभर भीषण हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील बंडखोर गट हेझबोलचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागार अली युसूफ हर्शी याला ठार करण्यात आल्याचा दावा इस्रायलने गुरुवारी दिलीयं. आयडीएफने बैरुतमध्ये हेझबोलाचा सेक्रेटरी जनरल नईम कासिम याचा खाजगी सचिव आणि पुतण्या अली युसूफ हार्षी याला ठार केले आहे. रात्रीच्या वेळी हेझबोलाच्या दहशतवादी पायाभूत सुविधांच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात आल्याचं इस्त्राइली लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलंय.
हर्षी हा नईम कासिमचा अत्यंत जवळचा सहकारी आणि वैयक्तिक सल्लागार होता. हेझबोला प्रमुखाच्या कार्यालयाचे व्यवस्थापन पाहण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. आयडीएफने असेही नमूद केले की, त्यांनी लेबनॉनमधील लिटानी नदीच्या उत्तर ते दक्षिण भागात प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या क्रॉसिंगवरही हल्ले केले आहेत. या मार्गांचा वापर हजारो शस्त्रे, रॉकेट्स आणि लाँचर्स यांच्या वाहतुकीसाठी केला जात होता, असं इस्रायली लष्कराने सांगितलंय.
