Kospi crashes 11% as global selloff deepens: इराण-इस्रायल युद्धामुळे जगाच्या शेअर बाजारात घसरण होत होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर शेअर बाजारात चढ-उतार होत होता. शेअर बाजारात डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) इफेक्ट मानला जात होता. परंतु आता हा इफेक्ट कमी झाला असताना दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात एका दिवसात सर्वात मोठी घसरण झालीय. दक्षिण कोरियाचा कोस्पी (Kospi) इंडेक्स एका दिवसात तब्बल अकरा टक्क्यांनी कोसळलाय. हा इंडेक्स केवळ दोन शेअर्समुळे इतका कोसळला आहे. यामागे कारण आहे चीनच्या एआय कंपन्या.
एक अधिकारी, एक सरकारी गाडी; अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाने नवीन कार्यालयीन ज्ञापन जारी
28 जुलै रोजी SK Hynix चा शेअर एका दिवसात 14 टक्क्यांहून अधिक कोसळला. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये तब्बल 41 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात दक्षिण कोरियाच्या प्रमुख कोस्पी (KOSPI) निर्देशांकात 28 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्यापैकी 28 जुलै रोजीच निर्देशांक (इंडेक्स) सुमारे 11 टक्क्यांनी घसरला. या घसरणीत चिप उत्पादन करणाऱ्या दोन प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सचा मोठा वाटा आहे.
Samsung Electronics चा शेअरही 32% घसरला
Samsung Electronics चा शेअर 28 जुलै रोजी 13.39 टक्क्यांनी घसरला. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्येही जवळपास 32 टक्क्यांची घसरण झालीय. या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समधील मोठ्या घसरणीमुळे दक्षिण कोरियाचा शेअर बाजार जोरदार दबावाखाली आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात याच दोन शेअर्सनी कोस्पीला जगातील सर्वाधिक परतावा देणाऱ्या बाजारांपैकी एक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
SK Hynix ने वर्षभरात दिला 491% परतावा
SK Hynix आणि Samsung Electronics या दोन्ही कंपन्या सेमीकंडक्टर (चिप) उत्पादन क्षेत्रातील दिग्गज आहेत. गेल्या दीड वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि चिप उद्योगातील वाढत्या मागणीमुळे जागतिक गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. अलीकडील घसरण असूनही, SK Hynix चा शेअर गेल्या एका वर्षात 491 टक्क्यांनी, तर Samsung Electronics चा शेअर 212 टक्क्यांनी वाढला आहे.
चीनच्या CXMT च्या दमदार लिस्टिंगचा परिणाम
कोस्पी निर्देशांकात या दोन्ही कंपन्यांचा वाटा 60 टक्के आहे. त्यामुळे त्यांच्या शेअर्समधील घसरणीचा थेट परिणाम संपूर्ण बाजारावर झाला आहे. तर चीनमधील ChangXin Memory Technologies (CXMT) या चिप उत्पादक कंपनीची शेअर बाजारातील लिस्टिंग अत्यंत दमदार ठरली. कंपनीचा शेअर पहिल्याच दिवशी इश्यू किमतीपेक्षा तब्बल 466 टक्क्यांनी वाढला.
चीनच्या वाढत्या चिप उत्पादन क्षमतेची भीती
याशिवाय, चीनमधील एका सरकारी कंपनीने इमर्शन DUV लिथोग्राफी उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चीनची चिप उत्पादन क्षमता झपाट्याने वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याचा थेट फटका दक्षिण कोरियातील चिप उत्पादक कंपन्यांना बसू शकतो. परिणामी SK Hynix आणि Samsung Electronics या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम संपूर्ण दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारावर दिसून येत आहे.
