Donald Trump On Crude Oil Prices : इराण आणि अमेरिकेत शांतता करार झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने याचा मोठा फायदा आता कंपन्यांना मिळताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यानंतर देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दर कमी होत नसल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रमुख केल कंपन्यांना इंधनाचे दर कमी करण्याचे आदेश दिले आहेत. तेल कंपन्या जनतेची लूट करत आहेत आणि प्राइस गॉजिंग करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी तेल कंपन्यांवर केला आहे.
ट्रम्प (Donald Trump) यांनी अमेरिकन तेल कंपन्या (American oil companies) आणि पेट्रोल पंप संघटनांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जागतिक भू-राजकीय तणाव आणि बाजारातील कल यामुळे कच्च्या तेलाच्या किमती अलीकडेच प्रति बॅरल 68 डॉलर्सच्या आसपास खाली आल्या आहेत.जेव्हा कच्च्या तेलाचे भाव वाढतात तेव्हा या कंपन्या काही तासांतच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवतात परंतु आता भाव 68 डॉलर्सपर्यंत खाली आले असतानाही, त्या सामान्य अमेरिकन नागरिकांना याचा लाभ मिळवून देण्यात अपयशी ठरत आहेत असं म्हणत त्यांनी या प्रकरणात अमेरिकेच्या न्याय विभागाला चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत. तसेच जर विक्रेत्यांनी त्वरित दर कमी केले नाहीत, तर त्यांना गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
‘अल जझीरा’ च्या अहवालांनुसार, मध्य पूर्वेतील संकट आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या काही महिन्यांत अमेरिकेत पेट्रोलचे दर गगनाला भिडले होते, ज्यामुळे सामान्य जनतेवर प्रचंड आर्थिक ताण आला होता.
या संकटाच्या काळात, जागतिक तेल कंपन्यांनी (एक्सॉनमोबिल, शेल आणि शेवरॉन) अब्जावधी डॉलर्सचा ‘विंडफॉल प्रॉफिट’ (अचानक मिळालेला प्रचंड नफा) कमावला. सामान्य अमेरिकन नागरिक जिथे प्रति गॅलन 4.50 डॉलर्सपर्यंतच्या महागड्या दराने इंधन खरेदी करण्यास भाग पाडले जात होते, तिथे केवळ संघर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांतच प्रमुख तेल कंपन्यांनी सुमारे 23 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त नफा कमावला
तेल कंपन्यांची बाजू: “दर आमच्या हातात नाहीत”
या टीकेनंतर, तेल उद्योग आणि रिफायनिंग (शुद्धीकरण) संस्थांनी आपली बाजू मांडली आहे. उद्योग समूहांचे म्हणणे आहे की, पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर केवळ कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून नसतात त्यात इतर अनेक जागतिक घटकांचाही समावेश असतो, जसे की:
रिफायनिंग क्षमतेचा अभाव
: कच्च्या तेलाचे पेट्रोलमध्ये रूपांतर करणाऱ्या रिफायनरींच्या (शुद्धीकरण प्रकल्पांच्या) स्वतःच्या कार्यक्षमतेच्या मर्यादा आणि खर्च असतात.
स्थानिक करांचा बोजा
: कॅलिफोर्नियासारख्या अमेरिकन राज्यांमध्ये गॅसवर (इंधनावर) उच्च स्थानिक कर लागू आहेत. ज्या धोरणावर खुद्द ट्रम्प यांनीही टीका केली आहे आणि यामुळेच पेट्रोलचे दर कमी होण्यास अडथळा येत आहे.
