Download App

‘भारतविरोधी शक्तीवर कारवाई करा’ पंतप्रधान मोदींची ऋषी सुनक यांच्याशी चर्चा

PM Modi Talk To Rishi Sunak: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (गुरुवारी) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान ऋषी सुनक यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या G20 परिषदेसाठी ब्रिटनचे पूर्ण समर्थन असल्याचे सांगितले.

देशाची आर्थिक फसवणूक करून फरार झालेल्याचे प्रत्यार्पण आणि लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी आणि सुनक यांच्यात चर्चा झाली. अधिकार्‍यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणात आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्यासाठी कडक पावले उचलण्याची मागणी केली. यासोबतच पीएम मोदींनी ब्रिटनमधील भारतीय राजनैतिक सुविधांच्या सुरक्षेचा मुद्दाही सुनक यांच्यासोबत उपस्थित केला. ब्रिटनमधील भारतविरोधी घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पंतप्रधानांनी केली आहे.

भाजपला कर्नाटकात झटका, तिकीट नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्र्याचा राजीनामा

पंतप्रधान सुनक म्हणाले की, यूके भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्याची निंदा करत आहे. भारतीय मिशन आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी देतो. पंतप्रधान मोदींनीही ब्रिटनमधील रहिवाशांना बैसाखीच्या शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वीच खलिस्तान समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालय परिसरात तोडफोड केली होती. यानंतर भारताने जोरदार आक्षेप घेत या घटनेची निंदा केली होती. उच्चायुक्तालयाच्या सुरक्षेबाबत भारताने ब्रिटिश सरकारवर आरोप केले होते.

दोन्ही नेत्यांनी अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला, विशेषत: व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील सहकार्याशी संबंधित. भारत-यूके रोडमॅप 2030 मध्ये उपस्थित असलेल्या अनेक द्विपक्षीय प्रकल्पांच्या पुनरावलोकनासह दोन्ही देशांमधील परस्पर फायदेशीर मुक्त व्यापार कराराला लवकर अंतिम रूप देण्याच्या गरजेवरही भर देण्यात आला.#

Tags

follow us