23,733 फूट उंच पर्वतावरून कोसळला बर्फाचा महाकाय तुकडा; नेपाळमध्ये महाप्रलयाची Inside Story

Nepal Floods : नेपाळच्या उत्तरेकडील पर्वतीय भागात बुधवारी, 26 ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने अभूतपूर्व विध्वंस घडवला.

Nepal Floods

Nepal Floods

Nepal Floods : नेपाळच्या उत्तरेकडील पर्वतीय भागात बुधवारी, 26 ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडने अभूतपूर्व विध्वंस घडवला. सुरुवातीला ही केवळ अचानक आलेली पूरस्थिती किंवा भूस्खलन असल्याचे मानले जात होते. मात्र, उपग्रह छायाचित्रे आणि तज्ज्ञांच्या प्राथमिक विश्लेषणातून या आपत्तीमागे हिमनदीचा मोठा भाग कोसळून तयार झालेला बर्फ-दगडांचा प्रचंड लोट असल्याची शक्यता समोर आली आहे. या घटनेत सुमारे 2 हजार फूट रुंद बर्फाचा महाकाय भाग तब्बल 4 हजार फूट खाली घाटीत कोसळला, त्यानंतर बर्फ, दगड, माती आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह नदीच्या दिशेने धावला असल्याचा दावा देखील आता सोशल मीडियावर करण्यात येत आहे. तर दुसरीकडे चीनकडून अरुणाचल प्रदेशाच्या सीमेजवळ उच्च भूकंपीय क्षेत्रात 60,000 मेगावॅट क्षमतेच्या (megawatt (MW)) मेडोग धरण ( Medog Dam) उभारले जात असल्याचा दावा देखील सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

7,234 मीटर उंच पर्वतावरून सुरू झाला विध्वंस

सोशल मीडियावर करण्यात येत असलेल्या दाव्यांनुसार, या आपत्तीचा संबंध 7,234 मीटर म्हणजेच सुमारे 23,733 फूट उंच लांगटांग लिरुंग पर्वताशी जोडला जात आहे. काठमांडूपासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या या पर्वताच्या उत्तरेकडील भागातील हिमनदीचा मोठा तुकडा सुमारे 5,200 मीटर उंचीवरून तुटून 1,200 मीटर खाली घाटीत कोसळल्याचे उपग्रह छायाचित्रांवरून दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बर्फाचा हा भाग खाली कोसळताना त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणावर दगड, माती आणि इतर मलबा वाहून आला. या प्रचंड लोटाने नदीचा प्रवाह रोखला आणि काही काळासाठी पाण्याचे मोठे साठे तयार झाले. त्यानंतर हा अडथळा तुटताच पाणी आणि मलब्याची भिंत त्रिशूली नदीच्या दिशेने वेगाने धावली असं देखील या दाव्यात सांगण्यात येत आहे.

हिमनदी कोसळणे म्हणजे नेमकं काय?

हजारो वर्षांपासून पर्वतांवर साचलेली बर्फाची प्रचंड रचना म्हणजे हिमनदी. तापमान वाढणे, बर्फ वितळणे, मुसळधार पाऊस, पर्वताच्या उतारांची अस्थिरता किंवा भूकंपीय हालचालींमुळे हिमनदीचा एखादा भाग अचानक अस्थिर होऊ शकतो. असा मोठा बर्फाचा भाग तुटून वेगाने खाली कोसळला की त्याच्यासोबत दगड-मातीही वाहून येते. त्यामुळे केवळ बर्फाचा हिमस्खलन राहत नाही, तर बर्फ, दगड, माती आणि पाण्याचा प्रचंड वेगवान प्रवाह तयार होतो. यालाच ‘आइस-रॉक एव्हलाँच’ किंवा हिमनदी कोसळण्याची घटना म्हटले जाते. नेपाळमध्ये सध्या समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार अशीच प्रक्रिया घडल्याचा अंदाज आहे.

भूकंप कारण होता की परिणाम?

या दुर्घटनेनंतर भूकंपाचाही मुद्दा चर्चेत आला. बुधवारी सकाळी चीनच्या सीमेजवळ 4.4 तीव्रतेची भूकंपीय हालचाल नोंदवण्यात आली होती. मात्र, या भूकंपामुळे हिमनदीचा भाग कोसळला की बर्फ, दगड आणि मलब्याच्या प्रचंड हालचालीमुळेच भूकंपीय ऊर्जा निर्माण झाली, याबाबत अद्याप निश्चित निष्कर्ष आलेला नाही. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेच्या प्राथमिक विश्लेषणानुसार नोंदवलेली भूकंपीय ऊर्जा हिमनदी, खडक आणि बर्फ मोठ्या प्रमाणावर कोसळल्यामुळेही निर्माण झालेली असू शकते. त्यामुळे भूकंप हा या आपत्तीचा ट्रिगर होता की स्वतः हिमनदी कोसळल्यामुळे भूकंपीय हालचाल झाली, हे तपासले जात आहे.

हवामान बदलाचा संबंध?

तज्ज्ञांच्या मते हिमालयातील वाढते तापमान हा या घटनांमधील महत्त्वाचा घटक असू शकतो. तापमान वाढल्याने हिमनद्या मागे सरकत आहेत, बर्फ वितळत आहे आणि पर्वतीय उतारांवरील संरचना अधिक अस्थिर होत आहेत. हिमनद्या मागे सरकल्यानंतर तयार होणाऱ्या मोरेन भागात पाणी साचणे, बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढणे आणि पर्वताच्या उतारांची स्थिरता कमी होणे यामुळे भविष्यात अशा घटनांचा धोका वाढू शकतो.

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलगरीचे अर्थ सायंटिस्ट डॅन शुगर यांच्या विश्लेषणानुसार, दुर्घटनेच्या आधीच्या 24 तासांत संबंधित भागात मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळल्याचे उपग्रह छायाचित्रांमधून संकेत मिळाले आहेत. मात्र, या आपत्तीचे अंतिम कारण निश्चित करण्यासाठी आणखी वैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे.

GLOF आणि हिमनदी कोसळणे यात फरक काय?

नेपाळमधील घटनेबाबत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही ग्लेशियल लेक आऊटबर्स्ट फ्लड (GLOF) होती का? GLOF म्हणजे हिमनदीजवळ तयार झालेल्या तलावाचा नैसर्गिक बांध तुटणे आणि मोठ्या प्रमाणावर पाणी अचानक खाली वाहून येणे. मात्र, सध्याच्या उपग्रह छायाचित्रांच्या प्राथमिक विश्लेषणानुसार नेपाळमधील दुर्घटनेत हिमनदीचा मोठा भाग तुटणे आणि त्यातून निर्माण झालेला बर्फ-दगडांचा लोट ही प्रमुख प्रक्रिया असल्याचे दिसत आहे. अंतिम निष्कर्ष मात्र सविस्तर वैज्ञानिक तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

लांगटांग लिरुंगचा इतिहासही आहे धक्कादायक

लांगटांग लिरुंग पर्वताला अशा दुर्घटनांचा इतिहास आहे. 2015 मध्ये नेपाळमध्ये झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपानंतर या पर्वताच्या दक्षिण भागातून मोठा हिमस्खलन झाला होता. बर्फ आणि मलब्याचा प्रचंड लोट खाली येऊन लांगटांग गावाला गाडून गेला. या दुर्घटनेत किमान 300 जणांचा मृत्यू झाला होता. यावेळची घटना मात्र पर्वताच्या उत्तरेकडील भागाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

काही मिनिटांत वाहून गेले पूल, रस्ते आणि वीज प्रकल्प

फ्लॅश फ्लडच्या प्रचंड वेगामुळे नेपाळच्या रसुवा भागातील पायाभूत सुविधांना मोठा फटका बसला आहे. भोटे कोसी आणि त्रिशूली नद्यांवरील अनेक पूल, महामार्ग, जलविद्युत प्रकल्प, वीज उपकेंद्रे आणि ट्रान्समिशन लाइनचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नदीच्या प्रवाहापासून दूर असलेली पायाभूत सुविधादेखील मलब्याच्या प्रचंड लोटामुळे उद्ध्वस्त झाली. नुवाकोटमधील 25 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पही मलब्याखाली गाडला गेल्याचे वृत्त आहे.

मृतांचा आकडा 207 पार; शेकडो जण बेपत्ता

या आपत्तीत 207 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. शेकडो लोक अद्याप बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय नागरिकही या दुर्घटनेत अडकले आहेत. भारत सरकारने नेपाळला मदतीचा हात पुढे केला असून बचाव आणि मदतकार्यासाठी आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.

दिलासा, साखर 52 रुपये प्रतिकिलो तर गुळाच्या दरात तब्बल 1600 रुपयांची घसरण

हिमालयासाठी मोठा इशारा

नेपाळमधील ही घटना केवळ एका भागापुरती मर्यादित नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हिमालयीन प्रदेशात मागील काही वर्षांत चमोली, मेलामची, सिक्कीम, थामे आणि भोटे कोसी यांसारख्या भागांत हिमनदी, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरांच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे एक गोष्ट स्पष्ट होत आहे हिमालयातील हवामान आणि पर्वतीय भूभाग वेगाने बदलत आहे. हिमनद्या वितळणे, पर्माफ्रॉस्ट कमकुवत होणे, मोरेन अस्थिर होणे आणि ग्लेशियल तलाव वाढणे यामुळे भविष्यात अशा आपत्तींचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हिमालयीन देशांसाठी पूर्वसूचना यंत्रणा, उपग्रह निरीक्षण, सीमापार माहितीची देवाणघेवाण आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे आता अत्यावश्यक बनले आहे. नेपाळची ही आपत्ती म्हणजे केवळ एका नदीला आलेला पूर नाही; हिमालयातील बदलत्या हवामानाचा आणि अस्थिर होत चाललेल्या पर्वतीय भूभागाचा हा गंभीर इशारा मानला जात आहे.

Exit mobile version