Nobel Peace Prize : दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशीय मानवाधिकार कार्यकर्त्या नवनेथम नवी पिल्लई (Navanethem Navi Pillay) यांना यंदाचा शांततेचा नोबेल (Nobel Peace Prize) पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय वंशाच्या असलेल्या नवी पिल्लई यांचा जन्म तमिळ कुटुंबात झाला. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरोधातील लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहेत.
कोण आहेत नवनेथम नवी पिल्लई?
दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांना मदत करणे आणि त्यांचा कायदेशीर बचाव करणे, यासाठी नवी पिल्लई ओळखल्या जातात. याशिवाय गंभीर गुन्हे आणि नरसंहारासाठी जबाबदार असलेल्यांना आरोपींना शिक्षा मिळवून देण्याच्या प्रक्रियेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नवी पिल्लई यांनी दक्षिण आफ्रिकेत न्यायाधीश म्हणूनही काम केले आहे. 1995 मध्ये त्यांची दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
नानांच्या निधनाआधीचा ‘तो’ शेवटचा फोन; हेमा मालिनींनी सांगितली मनाला चटका लावणारी आठवण
भारतीय-तमिळ कुटुंबात जन्म
नवनेथम नवी पिल्लई यांचा जन्म 23 सप्टेंबर 1941 रोजी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे भारतीय-तमिळ कुटुंबात झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात वकील म्हणून केली. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरोधातील लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. नेल्सन मंडेला यांच्यासह अनेक राजकीय कैदी आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी कायदेशीर लढा दिला आहे. 2008 ते 2014 या कालावधीत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून काम पाहिले आहे. या पदावर असताना जगभरातील मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
भारताशी काय आहे नाते?
नवनेथम नवी पिल्लई या भारतीय वंशाच्या आहेत. त्यांचे पूर्वज तमिळनाडूमधून दक्षिण आफ्रिकेत गेले होते. त्यांच्या आजोबांनी करारबद्ध मजूर म्हणून काम केले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा इतिहास भारताशी जोडलेला आहे. नवी पिल्लई यांनी अनेकदा आपल्या भारतीय मुळांविषयी अभिमान व्यक्त केला आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरोधातील संघर्षाचा अभ्यास करताना गांधीजींच्या विचारांचा त्यांना आधार मिळाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तपदावर असताना त्यांनी भारतालाही भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मानवाधिकार आणि महिलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली होती.
रवांडा नरसंहारातील आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका
1994 मध्ये रवांडामध्ये भीषण नरसंहार झाला. या काळात तुत्सी समुदायातील मोठ्या संख्येने लोकांची हत्या करण्यात आली. या नरसंहारातील आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यात आले. या प्रकरणांच्या सुनावणीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. 1995 मध्ये नवी पिल्लई यांची या न्यायाधिकरणावर न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 1999 ते 2003 या कालावधीत त्यांनी न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. नरसंहार आणि मानवतेविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षा मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
