Download App

India vs Canada : 8 लाख मतांच्या लोण्यासाठी जस्टिन ट्रूडो घेतायत भारताशी पंगा…

India vs Canada : हरदीपसिंग निज्जर… हा तोच खलिस्तानी दहशतवादी आहे, ज्याच्यामुळे भारत आणि कॅनडामधील वातावरण सध्या चांगलचं तणावाचं बनलं आहे. कॅनडाने त्याच्या हत्येचा आरोप थेट भारतावर केला आहे. दुसऱ्या बाजूला दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदुतांची हकालपट्टी केली. भारताने कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे अनिश्चित काळासाठी बंद केलं आहे. याशिवाय दोन्ही देशांमधील व्यापारावरही या प्रकरणाचा गंभीर परिणाम झाला आहे. भारतावर या हत्येचे आरोप करण्यापूर्वी कॅनडाच्या पंतप्रधानांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. शिवाय या आरोपांचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होणार याची कल्पना तर त्यांना नक्कीच असणार आहे.

पण तरीही कॅनडाने भारतावर आरोप करत पुन्हा एकदा स्थानिक राजकारणासाठी शीख धर्मीयांना चुचकारण्याचा आणि भारताला खलनायक बनविण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. कॅनडाने शीख धर्मीयांना पुरक भूमिका घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिल्लीत सुरु असलेल्या कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनालाही कॅनडाच्या पंतप्रधानांनी जाहीर पाठिंबा दिला होता. तर 2016 मध्ये कामागाटामारू प्रकरणात कॅनडाच्या सरकारने शीख समाजाची जाहीर माफी मागितली होती. 329 लोकांचा बळी घेणाऱ्या तलविंदर परमार यालाही कॅनडाने भारताला सोपविण्यास नकार दिला होता. (Why Canada can’t afford to take an anti-Sikh stance)

यावरुनच आपल्याला कॅनडासाठी शीख धर्मीयांचे किती महत्व आहे, हे दिसून येते. पण हे इतके महत्व का आणि कॅनडाला शिखविरोधी भूमिका घेणे का परवडत नाही? हे पाहणे महत्वाचे ठरते.

या सगळ्याची सुरुवात होते अगदी गोष्ट आहे १८९७ मध्ये. भारताप्रमाणेच उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा देखील इंग्रजांची वसाहत प्रदेश होता. त्यावर्षी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांना सिंहासनावर येऊन साठ वर्षे पूर्ण झाली होती. हा सोहळा सर्व ब्रिटीश शासित वसाहतींमध्ये धुमधडाक्यात साजरा होणार होता. याच सेलिब्रेशनसाठी आणि सोहळ्याच्या सुरक्षेसाठी भारतीय सिख रेजिमेंट गेले होते. यातच होते रिसालदार मेजर केसुर सिंह. कॅनडाच्या धर्तीवर शीख म्हणून पहिले पाऊल ठेवण्याचा मान केसुर सिंह यांना दिला जातो. त्यांना कॅनडाचा प्रदेश खूपच आवडला अन् त्यांनी रिटार्यमेंटनंतर तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. हळू हळू तिकडे पगडीधारी शीख दिसू लागले.

India Canada Row : भारताच्या एका निर्णयामुळे डळमळीत होऊ शकते कॅनडाची एजुकेशन इकोसिस्टम

त्यानंतरच्या काळात कॅनडीयन पॅसिफिक रेल्वेचे काम सुरु झाले. त्यासाठी भारतातून मजूर नेण्यात आले. त्यावेळी अमेरिका एवढा नाही पण कॅनडा बराच विकसनशील प्रदेश होता. मोकळे मैदान असल्याने बरीच जमीन लागवडीखाली येत होती. यासाठी पंजाबमधून अनेक शेतकरी, आणि शेती केलेल्या रिटायर सैनिकांनी आपलं बस्तान कॅनडाला हलवलं. भारताप्रमाणेच कॅनडामध्येही ब्रिटीश राजवट असल्यामुळे भारतातील शीख समुदायाला कॅनडामध्ये सहज प्रवेश होता, याचाही फायदा झाला.

पण कॅनडामधील शीख समुदायांची वाढती संख्या पाहून तिथे विरोध होऊ लागला. कॅनडातून एक प्रतिनिधी भारतात आला आणि इथून कॅनडात होणारे स्थलांतर रोखावे यासाठी इथल्या प्रशासनाकडे हट्ट धरला.कॅनडा सरकारने आपले इमिग्रेशनचे नियम कायदे कडक केले. याच सर्व बदलत्या धोरणांमधून मगाशी उल्लेख केलेले कामागाटामारू प्रकरण घडलं. 1914 साली सिंगापूरचे एक श्रीमंत शीख उद्योगपती बाबा गुरदित सिंग हे कामागाटामारू या बोटीने 350 पंजाबीना कॅनडाला घेऊन गेले. पण तिथल्या सरकारने त्यांना प्रवेश नाकारला. कोणतेही बोलणे न ऐकून घेता गुरदीत सिंग यांना हाकलण्यात आले.

कामागाटामारू परत भारतात कलकत्त्याला आली. पण तिथल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हे सगळे प्रवासी गदर या क्रांतिकारी संघटनेशी संबंधित आहेत आणि ते सरकारविरुद्ध उठाव करत आहेत असा आरोप करून त्यांच्यावर गोळीबार केला. यात जवळपास 20 शीख मारले गेले. इंग्रज प्रशासनाच्या या क्रूर वागण्याबद्दल जगभर टीका करण्यात आली. भारतातही अनेक आंदोलने झाली. याचा प्रचंड राग शीख समुदायात कोरला गेला आणि इंग्रजांची राजवट उलथवून लावण्याकरता पंजाबी माणूस एकवटला.

दुसऱ्या बाजूला कॅनडामध्ये राहत असलेल्या शीख समुदायाने पाळेमुळे घट्ट रुजवली, दुसरे महायुद्द येता येता कॅनडामधील स्थलांतर कायदे शिथील झाले, पैसे कमविण्यासाठी पुन्हा शीख समुदायाचा कॅनडाकडे ओढा वाढला. शीख धर्मीयांना मतदानाचाही अधिकार मिळाला. यानंतर मागील 75 वर्षांमध्ये कॅनडामधील शीख समुदायाची संख्या प्रचंड वाढली आहे. आज कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या 18 लाखांच्या घरात आहे. तर त्यातील सर्वात मोठा गट म्हणजे जवळपास 4 टक्के शीख समुदायाचा आहे. शीख समुदायाची संख्या सुमारे 7 लाख 80 हजार आहे. कॅनडात जवळपास 200 गुरुद्वारा आहेत. पंजाबी भाषा ही कॅनडामधील चौथी अधिकृत भाषा आहे. गतवेळी झालेल्या निवडणुकीत येथे 18 शीख खासदार निवडून आले होते. कॅनडातील राजकीय पक्षांच्या क्रमवारीत ‘न्यू डेमोक्रॅटिक पार्टी’ हा तिसऱ्या क्रमांकावर असलेला विरोधी पक्ष आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाच्या नेतेपदी जगमीत सिंग यांची निवड झाली होती.

भारत अन् कॅनडामधील तणाव शिगेला; जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडले?

याचमुळे कॅनडामध्ये शिखविरोधी भूमिका घेतली जात नाही. कोणताही कॅनडीयन पंतप्रधान सत्तेवर आले तरी ते अमृतसरला येऊन सुवर्ण मंदिराला भेट देतात. भारतात ज्याप्रमाणे एखादा गट मतांमध्ये निर्णायक भूमिका बजावतो त्याप्रमाणे कॅनडामध्ये शीख समुदाय हा निर्णायक घटक आहे. यातून मग कधी खलिस्तानी पुरक भूमिकाही घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. शिख फॉर जस्टिस’ने 2022 मध्ये कॅनडात स्वतंत्र खलिस्तानबाबत सार्वमत आयोजित केलं होतं. खलिस्तानच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या सार्वमतात एक लाख लोक सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला होता. त्यावेळी भारत सरकाने कॅनडाला जोरदार शब्दात फटकारले होते. अनेक खलिस्तानवादी दहशतवादी हे आश्रयासाठी कॅनडाचा आधार घेत असतात. पण कॅनडा या बहुसंख्य समुदायाविरोधात भूमिका घेताना दिसत नाही. उलट अनेकदा पाठिंबाच दिलेला पाहायला मिळतो

Tags

follow us