6 dead after part of chawl collapses : मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पावसाने कहर केला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसादरम्यान मानखुर्द परिसरात एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमधील जनता नगर परिसरात जी+3 चाळीचा काही भाग कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हनुमान मंदिरामागील जनता नगर परिसरात तळमजला अधिक तीन मजली चाळीच्या इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. चाळ क्रमांक 5 मधील दोन ते तीन घरांचा भाग ढासळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. सुरुवातीला चार ते पाच जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, बचावकार्यातून समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिका कर्मचारी तसेच 108 रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवून अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांनी युद्धपातळीवर मोहीम राबवली. सतत सुरू असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असले तरी यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी; कॉल रेकॉर्डिंग झाली व्हायरल
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी मुसळधार पावसाचा आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील सर्व शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा तसेच महाविद्यालयांना 6 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, शासकीय आणि खासगी कार्यालये नियमित सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मुंबईबरोबरच पालघर आणि रायगड जिल्हा प्रशासनानेही मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने रायगड, नाशिक, पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला असून मुंबई, ठाणे आणि इतर किनारी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली असली तरी प्रशासकीय यंत्रणा मात्र पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले असून आवश्यकतेनुसार त्यांची आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांसाठी मदत घेतली जाणार आहे.
मुसळधार पाऊस, हवामान विभागाचे इशारे आणि मानखुर्दमधील दुर्घटना यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
