A unique explanation by Sujay Vikhe : नगर दक्षिणचे माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. राहुरी येथे आयोजित तिरंगा रॅलीदरम्यान झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावर भाष्य करताना थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली. जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि त्यातून निर्माण झालेल्या कच्च्या मालाच्या तुटवड्याचा परिणाम रस्त्यांच्या कामांवर होत असल्याचा दावा त्यांनी केला.
यावेळी बोलताना सुजय विखे पाटील यांनी आपल्या खास शैलीत भाष्य केले. मी व्यवसायाने मेंदूचा डॉक्टर आहे. मात्र राजकारणात आल्यानंतर माझाच मेंदू खराब झाला, असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. त्यानंतर त्यांनी नगर जिल्ह्यात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत, नगरमध्ये जवळपास ४० हजार कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. मात्र काही महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांना सध्या अडथळे येत आहेत, असे सांगितले.
नगर–मनमाड महामार्गाच्या कामात होत असलेल्या विलंबाबाबत बोलताना त्यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले. डोनाल्ड ट्रम्पसारखा वेडा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही. त्यांच्या धोरणांमुळे आणि जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संघर्षांमुळे रस्त्यांसाठी लागणारे डांबर मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकदा हे डांबर थेट दिल्लीवरून आणावे लागत आहे. त्यामुळे केवळ नगर-मनमाडच नव्हे, तर इतर अनेक रस्त्यांची कामेही खोळंबली आहेत, असा दावा त्यांनी केला.
पान मसाला जाहिरातींवर FDA चा बडगा; अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस
रस्त्यांच्या कामावरून सुरू असलेल्या आंदोलनांवर आणि सोशल मीडियावरील टीकेवरही त्यांनी भाष्य केले. महामार्गाच्या कामासाठी केवळ आंदोलन करणे किंवा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणे हा उपाय नाही. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी काही काळ संयम ठेवण्याची गरज आहे. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे आवाहन त्यांनी केले.
नगर-मनमाड महामार्ग हा जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सांगत, हा रस्ता पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. नगर-नमाड रस्ता पूर्ण करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती माझ्याकडे आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला.
दरम्यान, नगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना सुजय विखे पाटील यांनी केलेल्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख करत महामार्गाच्या विलंबाचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या वक्तव्याची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
